व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये अभियांत्रिकी बरोबरच फार्मसी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.त्यातही एकट्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये राज्यातील तब्बल ८० टक्के फार्मसी अभ्यासक्रमाचे प्रवेश होतात. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया बरोबरच परीक्षेबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये उत्सुकता असते. यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला उशिर झाला. विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षनुसार एप्रिल महिन्यामध्ये प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातात. त्यामुळे फार्मसीच्या परीक्षा सुद्धा एप्रिल मध्ये होतील, अशी चर्चा केली जात आहे. मात्र, काही व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध कौन्सिलच्या नियमांचे पालन करावे लागते. फार्मसी कौन्सिलने दिलेल्या सूचनांनुसार विद्यार्थ्यांचे सर्व प्रात्यक्षिके आणि ७५ लेक्चर घेतल्याशिवाय परीक्षा घेता येत नाहीत. त्यामुळे फार्मसी अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढील एक ते दोन महिन्यात होणार नसल्याचे स्पष्ट होते.
----
कौन्सिल ऑफ फार्मसी नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. त्यामुळे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची ७५ थेअरी लेक्चर आणि सर्व प्रात्यक्षिके घेतल्यानंतरच या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातील. येत्या जून महिन्याच्या दुस-या किंवा तिस-या आठवड्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे.
- प्राचार्य, के. एन. गुजर, सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी,
---
विद्यापीठाच्या नियमावली बरोबरच फार्मसी कौन्सिलच्या नियमांचेपालन करणे आवश्यक असते. त्यामुळे सर्व अभ्यासक्रम व प्रात्यक्षिके पूर्ण झाल्यावरच विद्यार्थ्यांच्या परीक्षा होतील.
- ऐश्वर्या शहा, विद्यार्थी
----
अभ्यासक्रम पूर्ण झाल्याशिवाय विद्यार्थ्यांच्या परीक्षा होत नाहीत. त्यामुळे प्रवेशानंतर एक-दोन महिन्यात परीक्षा होतील, असे वाटत नाही.
-साक्षी मोरे, विद्यार्थी