पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशासाठी येत्या २१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असली तरी प्राध्यापकांना मार्गदर्शक होण्यासाठी आवश्यक नोंदणी करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यापीठाने या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी प्राध्यापक व पीएच.डी. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
पुणे विद्यापीठातील विविध विभाग व विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांतील संशोधन केंद्रमधील पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या प्रवेश प्रक्रियेंतर्गत नव्याने पीएच.डी. गाईड होऊ इच्छिणाऱ्या प्राध्यापकांना नोंदणी करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पत्रकारितेसह आणखी काही विषय अद्याप विद्यापीठाच्या यादीत दिसत नाहीत. प्राध्यापक पात्र असूनही त्यांना गाईड होता येत नाही. तसेच गाईड उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करता येत नाही. त्यामुळे पीएच.डी. प्रवेशाच्या अडचणी केव्हा दूर होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
--------------------------
प्रक्रिया सुरळीत केव्हा होणार?
पीएच.डी. प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत दोन ते तीन वेळा वाढविण्यात आली आहे. मात्र, काही विषयांसाठी गाईडच उपलब्ध नाहीत. या वर्षी तरी पीएच.डी. प्रवेशाची संधी उपलब्ध होणार का? अशी चिंता विद्यार्थ्यांना सतावत आहे. प्राध्यापकांना गाईड नोंदणीसाठी येणारी अडचण दूर झाल्यानंतरच प्रवेश प्रक्रिया सुरळीत होणार आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने प्रथमत: या अडचणी सोडवाव्यात, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
---------------------
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार पीएच.डी. प्रवेशातील तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील. तसेच एकही पात्र विद्यार्थी पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल.
- प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ