लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा येत्या रविवारी (दि.५) रोजी घेण्यात येत आहे. यासाठी १५ हजार ५३८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. सेट-नेट उत्तीर्ण असलेल्या ४ हजार ११७ विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेपासून (पेट) सवलत देण्यात आली आहे.
पेट परीक्षा पूर्णत: ऑनलाइन पद्धतीने येत्या रविवारी घेण्यात येत आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दुपारी २ ते ८ या वेळेत, तर अन्य विद्याशाखांच्या परीक्षा सकाळच्या सत्रात घेण्यात येतील. १०० गुणांची ही प्रवेश परीक्षा होत असून, त्याचा निकाल ८ सप्टेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.
चारही विद्याशाखांमधून एकूण ५ हजार ३३३ पीएच.डी. प्रवेशाच्या जागा रिक्त आहेत. यासाठी पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले होते.
पेट परीक्षेसाठी १२ जुलैपासून अर्ज करण्याची सुरुवात झाली. त्यानंतर २१ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची मुदत दिली होती. त्यानुसार १५ हजार ५३८ विद्यार्थ्यांची पेट परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती शैक्षणिक प्रवेश विभागाकडून दिली. सेट अथवा नेट झालेल्या विद्यार्थ्यांना पेट परीक्षेपासून सवलत दिली जाते. असे ४ हजार ११७ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत.
---
चौकट
शाखानिहाय विद्यार्थी पुढीलप्रमाणे
विद्याशाखा पेटपासून सवलत पात्र विद्यार्थी एकूण विद्यार्थी रिक्त जागा
विज्ञान व तंत्रज्ञान : १५४४ ७२७७ : ८८२१ ३१३१
वाणिज्य व व्यवस्थापन : ४७३ २८२७ ३३०० १०१३
मानवविज्ञान : १५५० ४२८५ १५५० ५८३५
आंतरविद्याशाखीय अभ्यास : ५५० ११४९ १६९९ २०४
एकूण : ४११७ १५५३८ १९६५५ ५३३३