पुणे : पाषाण येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) येथे पीएचडी करीत असलेल्या विद्यार्थ्याचा गळ्यावर वार करून खून करण्यात आला. त्याची ओळख पटू नये, म्हणून त्याचे कपडे काढून चेहरा दगडाने ठेचण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह सूस येथील खिंडीत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सुदर्शन ऊर्फ बाल्या बाबूराव पंडित (वय ३०, रा. शिवनगर, सुतारवाडी मूळ रा. मु. जानेफळ (पंडित) ता. जाफराबाद, जि. जालना) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा चुलत भाऊ संदीप पंडित (वय ३४, रा. सुतारवाडी, पाषाण, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
संदीप पंडित हे मागील काही वर्षापासून पुण्यातील सुतारवाडी परिसरात राहण्यास आहेत. सुदर्शन हा पुण्यातील पाषाण येथील प्रसिध्द नॅशनल केमीकल लॅब्रॉटरी (एनसीएल) रसायन शास्त्र विषयात पीएच.डी. करण्यासाठी दीड वर्षापूर्वी पुण्यात आला होता. तो सुतारवाडी परिसरात पेईंग गेस्ट स्वरूपात राहत होता. काल रात्री तो घरी आला नव्हता. शनिवारी सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांना सूस खिंडीत एक मृतदेह पडलेल्या आढळून आला. सुदर्शनच्या अंगावरील कपडे काढून त्याच्या गळ्यावर वार करून व ओळख पटू नये यासाठी चेहरा विद्रुप करण्यासाठी दगडाने ठेचण्यात आल्याचे दिसून आले. घटनास्थळाजवळच एक पाकीट आढळले. त्यावरुन सुदर्शन याची ओळख पटली. पाकिटात आधारकार्ड होते. त्याच आधार कार्डाच्या आधारे पोलिसांना सुदर्शनच्या भावाविषयी माहिती समजले. तो पेईंग गेस्ट म्हणून रहात असलेल्या बरोबरच्या तरुणांकडे चौकशी केल्यावर तो अभ्यासासाठी जात असल्याने अनेकदा रात्री घरी येत नसे. त्यामुळे काल रात्री अभ्यासामुळे तो घरी आला नाही असे त्याच्या मित्रांना वाटले. त्याच्या खुनामागचे कारण समजू शकले नसून चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादा गायकवाड तपास करीत आहेत.