पुणे : नेट परीक्षेमध्ये सर्वोत्कृष्ट गुण मिळवून यूजीसीची फेलोशिप प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना ७ महिन्यांपासून फेलोशिप मिळालेली नाही. यूजीसीकडून फेलोशिपसाठीचे अनुदान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे जमा झाले नसल्याने त्यांना फेलोशिप देता येत नसल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले.नेट परीक्षेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमफिल व पीएचडी करण्यासाठी यूजीसीकडून ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) व सिनअर रिसर्च फेलोशिप (एसआरएफ) दिली जाते. या फेलोशिपअंतर्गत विद्यार्थ्यांना दर महिन्याला ३५ हजार रुपये दिले जातात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अनेक विद्यार्थ्यांना ही फेलोशिप मिळालेली आहे.पूर्वी दर महिन्याला विद्यार्थ्यांना फेलोशिपचा चेक मिळत होता, मात्र आता दर ३ महिन्यांनी विद्यार्थ्यांच्या खात्यात फेलोशिप जमा केली जात आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात खूपच अनियमितता आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठातील अकाऊंट विभागात याबाबत चौकशी केली असता यूजीसीकडे निधी नसल्याने फेलोशिप जमा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.दिल्लीत कुणी फोनच उचलत नाहीविद्यार्थ्यांच्या फेलोशिपबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून तसेच विद्यार्थ्यांकडून यूजीसीच्या दिल्ली कार्यालयातील अकाऊंट विभागाकडे सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अनेकदा रिंग वाजूनही कुणीही फोन उचलत नाही. त्याचबरोबर फेलोशिपबाबत संपर्क करण्यासाठी कोणतेही ई-मेल अॅड्रेस उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. यूजीसीच्या या दिरंगाईचा मोठा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.
पीएचडीचे विद्यार्थी फेलोशिपच्या प्रतीक्षेत
By admin | Published: May 03, 2017 3:03 AM