पुणे: विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मार्गदर्शकांची (गाईड) करावी, याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिलेल्या सूचनांनुसार विद्यापीठाने नियमावलीत बदल केले. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच पीएच.डी. प्रवेशाची जाहिरात प्रसिद्ध केली. परिणामी, नव्याने गाईड म्हणून निवड होणाऱ्या प्राध्यापकांना पीएच.डी.साठी विद्यार्थीच मिळणार नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी प्राध्यापकांकडून केली जात आहे.
यूजीसीच्या निर्देशानंतरही सुमारे चार ते पाच वर्षे पुणे विद्यापीठाने गाईड नियुक्तीबाबत नियमावलीमध्ये बदल केला नाही. त्यामुळे अनेक प्राध्यापकांना गाईड म्हणून काम करण्याची संधीच उपलब्ध होऊ शकली नाही. परिणामी पीएच.डी.साठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना गाईड नसल्यामुळे प्रवेश मिळाला नाही. विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी. प्रवेशाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. परंतु, त्यात काही विषयांसाठी प्रवेश दिले जाणार नसल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी पीएचडी प्रवेशापासून वंचित राहणार आहे.
विद्यापीठाकडून मान्यता मिळालेल्या पीएच.डी. गाईडकडे उपलब्ध असणाऱ्या जागांचा विचार करून पुणे विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेशाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यात पत्रकारिता विषयात संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना गाईड उपलब्ध नाहीत. विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेशासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असली, तरी पत्रकारिता विषय घेऊन संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्जच करता येणार नाही.त्यामुळे विद्यापीठाने याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन पत्रकारिता क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गाईड उपलब्ध करून द्यावेत, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
-----------
विद्यापीठाने नव्या नियमावलीनुसार प्राध्यापकांकडून गाईड संदर्भातील प्रस्ताव स्वीकारून त्यावर लवकर निर्णय घेतल्यास विद्यार्थ्यांना गाईड उपलब्ध होतील. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने पीएचडी प्रवेशासंदर्भातील सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी.
- डॉ. अजय दरेकर, अध्यक्ष, बेस्टा
----------------
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या आदेशानंतर नवी गाईडविषयी सुधारित नियमावली प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, या नियमावलीनुसार नव्याने गाईड होणाऱ्या प्राध्यापकांना संशोधनासाठी विद्यार्थीच मिळू नयेत म्हणून विद्यापीठाने जाहिरात प्रसिद्ध करण्याची घाई केली, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे, याबाबत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.