गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे फोटोग्राफर-व्हिडिओग्राफर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे लॉकडाऊनमुळे फोटोग्राफी क्षेत्राला मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. छायाचित्रकार बेरोजगार झालेला आहे. त्यामुळे फोटोग्राफी क्षेत्रात दरवाढ करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे. फोटोग्राफी क्षेत्रात मार्च, एप्रिल,मे आणि जून हे चार महिने लग्न समारंभ कार्यक्रमावर छायाचित्रकारांचे वार्षिक उत्पन्न अवलंबून असते. कोरोनामुळे आता लग्न, मुंज, बारसे, प्री-वेडिंग शूटिंग आदी धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध आल्याने फोटोग्राफी व्यावसायिक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. छायाचित्रकाराबरोबर डिझाइनर, एक्सपोजर, एडिटर व्हिडिओ एडिटिंग फोटो स्टुडीओ, फोटोलॅब, फोटोफ्रेम, लॅमिनेशन हे व्यवसाय करणाऱ्या सर्वांचेच काम ठप्प झाल्याने अडचणीत सापडले आहेत. प्री वेडिंग शूट, वेडिंग शूट, कॉर्पोरेट इव्हेंट, सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रम, राजकीय सभा, शासकीय कार्यक्रम, उद्घाटने शाळातील स्नेहसंमेलन, ओळखपत्र स्नेहमेळावा, शेतकरी मेळावा अशा कार्यक्रमांना निर्बंध असल्याने फोटोग्राफर व्यावसायिक अडचणीच्या चक्रात सापडले आहेत.
--
फोटोग्राफीचे दर वाढणार
फोटोग्राफर्स, व्हिडीओग्राफर्स यांच्यावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी या वेळी असोसिएशनच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तीत १ सप्टेंबरपासून भोर शहर व तालुक्यात फोटोग्राफी क्षेत्रात दरवाढ करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी भोर वेल्हा फोटोग्राफर व्हिडिओ असोसिएशची नवी कार्यकारिणी ठरविण्यात आली. त्याच्या अध्यक्षपदी सुधीर वाल्हेकर, उपाध्यक्षपदी अस्लम आतार सेक्रेटरीपदी निलेश रेणुसे, सहसेक्रेटरीपदी अनिस आतार, खजिनदारपदी विजय काटकर यांची निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सारंग शेटे हे होते. यावेळी धनंजय आंबवले,संतोष म्हस्के,इम्रान आतार प्रशांत कांटे, तोसीफ आतार,लुकेश मोदी,वैभव काटे आदी उपस्थित होते.