पुणे : राज्यातील नऊ कोटी मतदारांमध्ये ३२ लाख ७८ हजार मतदारांचे फोटो अस्पष्ट व खराब असल्याने येत्या पाच महिन्यांत ते बदलण्यात येणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत राज्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश दिले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. अशा निकृष्ट दर्जाचे फोटो असलेल्या पहिल्या सहा राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे.
राज्यात ५ जानेवारीला अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार राज्यात ९ कोटी २ लाख मतदार आहेत. या मतदारांच्या याद्यांमध्ये फोटो अस्पष्ट, निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले आहे. देशपांडे म्हणाले, ‘केंद्र निवडणूक आयोगाने स्वच्छ मतदार यादीवर भर दिला असून, नावे दुरुस्त करणे, हटविणे, भौगोलिकदृष्ट्या समान नोंदी आणि फोटोसारख्या नोंदींचे मूल्यांकन केले जात आहे, तसेच मतदार यादीतील फोटो चांगले असावेत, अशी अपेक्षा आहे.
राज्यात ३२ लाख ७८ लाख ४६४ मतदारांचे फोटो अस्पष्ट आहेत. असे मतदान कार्ड दुरुस्त करून ते अद्ययावत करावे लागणार आहेत. त्यासाठी राज्यातील ९६ हजार मतदान केंद्रांची जबाबदारी सांभाळणारे मतदान केंद्र अधिकाऱ्यांना हे काम करण्याचे निर्देश द्यावेत, असे जिल्हा निवडणूक अधिकारी अर्थात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.’
पाच महिन्यांचा काळ लागेल
फोटो बदलण्यासाठीची संख्या ही मोठी आहे, तर मतदार केंद्र अधिकाऱ्यांची संख्या केवळ ९६ हजार आहे. त्यामुळे या कामासाठी पुढील पाच महिन्यांचा काळ लागेल, असेही ते म्हणाले. यापैकी काही छायाचित्रे दोन दशकांपूर्वीची आहेत. त्यामुळे ते बदलणे गरजेचे आहे. मतदान केंद्र अधिकाऱ्यांना या मतदारांच्या घरी भेट देऊन मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी फोटो गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.