लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तरुणीला नग्न चित्रीकरण करण्यास भाग पाडून तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याच्या आरोपावरून नितीन ऊर्फ निकेश प्रकाश राठोड (वय २९, रा. मूळगाव हावनुर लमाण तांडा, ता. अफजलपूर, जि. गुलबर्गा, सध्या रा. महादेवनगर, हिंगणे, सिंहगड रस्ता) या तरुणास अटक केली आहे. राठोडने ‘रॉ’ संस्थेचे बनावट ओळखपत्र तयार करून उच्चपदस्थ असल्याचे भासवत तिच्या कुटुंबाला वारंवार ईमेल, मेसेज आणि कॉल करून छळवणूक केल्याचा आरोप आहे.
उत्तमनगर पोलिसांनी राठोडला अटक केली. न्यायाधीश जान्हवी केळकर यांनी त्याला २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ही घटना २०१८ ते १४ जुलै २०२१ दरम्यान फिर्यादी तरुणीच्या राहत्या घरी आणि कात्रजच्या आरंभ लॉजमध्ये घडली. आरोपीने स्वत: अनाथ असल्याचे सांगून भावनिक करून घरच्यांना मारून टाकण्याची धमकी देत तिला स्वत:चे दोन नग्न व्हिडिओ करायला भाग पाडले. आरोपीने वारंवार मानसिक त्रास दिल्याने तरुणीने ‘एक्सपायर’ झालेल्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
नग्न व्हिडिओ सोशल मीडिया व वेबसाईटवर टाकण्याची धमकी देत इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. आरोपीने फिर्यादीच्या परवानगीशिवाय तिचा मोबाईल अॅक्सेस मिळवला. अखेर तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. उत्तमनगर पोलीस ठाण्यात नितेश राठोड विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले. आरोपीने वेगवेगळे ईमेल आयडी कुठे आणि कोणत्या नावाने तयार केले आणि कोणत्या गुन्ह्यात वापरले याबाबत तपास करणे आवश्यक आहे. आरोपीने फिर्यादीच्या मोबाईलमध्ये एक विशिष्ट प्रकारचे अॅप डाऊनलोड करून मोबाईलचा अॅक्सेस स्वत: वापरला आहे.
फिर्यादीच्या मोबाईलमधून कोणती छायाचित्रे आणि व मेसेज व्हिडिओ ईमेलने पाठविले आहेत याचा सखोल तपास करायचा आहे. आरोपीने इतर महिला किंवा मुलींना त्रास दिला आहे का आदी जाणून घ्यायचे आहे. त्याने सीआरपीएफ तसेच रॉ या महत्त्वपूर्ण सैन्यदलाच्या विभागात उच्चपदावर काम केल्याचे ओळखपत्र दाखविले. त्या ओळखपत्राचा तपास करणे आवश्यक आहे. त्याकरिता सरकारी वकील किरण बेंडभर यांनी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. ती न्यायालयाने मान्य केली.