पुणे : आयुष्य सर्वसामान्य मुलांप्रमाणे सुरू असताना नकळत्या वयात झालेल्या अपघातातून बाहेर पडून सुयश जाधवने सातासमुद्रापार भारताचे नाव मोठे केले आहे. नुकतीच जकार्ता येथे झालेल्या एशियन पॅरा गेम्स २०१८ स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले असून, दोन कांस्यपदकेही मिळविली आहेत. अपंगत्वाने सीमाबंद झालेल्या आयुष्याला त्याने एक नवा आयाम दिला आहे.
सुयश मूळचा सोलापूर जिल्ह्यातल्या वेळापूरचा. सहावीला असताना भावाच्या लग्नात खेळताना सुयशच्या हातात असलेल्या खेळण्याचा विजेच्या प्रवाहाला स्पर्श झाला आणि काही क्षणात त्याने दोनही अपघातात गमावले. काही काळ त्या अपघातामुळे त्याच्या आयुष्यात अंधार पसरलाही होता. पण त्यातून घरच्यांच्या इच्छाशक्तीच्या आणि आंतरिक ऊर्मीच्या जोरावर त्याने मात केली आणि नवा अध्याय रचला. त्याला खरं तर लहानपणापासून जलतरणाची आवड. त्याचे वडील नारायण यांनी त्याला वयाच्या दुसऱ्या वर्षापासून पोहायला शिकवले होते. इतर मुलांच्या तुलनेत याचा पोहण्याचा वेग बघून क्रीडा शिक्षक असलेल्या त्याच्या वडिलांनी त्याला क्रीडा क्षेत्रासाठी निवडले. अनेक जिल्हा, राज्य पातळीवरील स्पर्धांमध्ये तो बक्षिसं मिळवत होता. अचानक अपघात झाला आणि जणू त्याच्या वाहत्या करिअरला खीळ बसली. पण त्याही परिस्थितीत कुटुंबीयांनी त्याला काहीही विशेष जाणवू दिले नाही. सर्वसामान्य मुलांप्रमाणे त्याला वाढवले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याचा सराव सुरू ठेवला. इयत्ता ९ वीत असताना त्याने पहिले राष्ट्रीय पदक मिळवले आणि त्यानंतर कधीही मागे वळून बघितले नाही.
आज त्याने विविध गटात सुमारे १०५ पदकांवर नाव कोरले आहे. एकदा तर अंगात १०४ डिग्री ताप असतानातो टँकमध्ये उतरला आणि जिंकलासुद्धा!
जगाचा चॅम्पियन होण्याची मनीषासर्व प्रवासाबद्दल सुयश म्हणतो, ‘खेळात असो किंवा आयुष्यात सातत्य, एकाग्रता आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही यश तुम्ही मिळवू शकता. प्रत्यक्ष खेळात फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक क्षमता सिद्ध करणेही महत्त्वाचे असते. आशियात नव्हे तर संपूर्ण जगात चॅम्पियन बनण्याची त्याची मनीषा आहे.जकार्ता येथे गेल्यावर बदललेले तापमान आणि प्रवास यामुळे त्याला काहीसा थकवा जाणवत होता. मात्र, मुख्य स्पर्धेच्या आदल्या रात्री त्याच्या पायाला अचानक गोळे आले. त्याचा त्रास इतका वाढला की त्याने भारतात प्रशिक्षकांना फोन केला. अखेर त्यांनी काही उपाय सांगितले पण शरीरापेक्षा मन सक्षम ठेवणाऱ्या सुयशने शारीरिक त्रासावर जय मिळवून सुवर्णपदक भारताच्या नावावर केले.