पुणे : वैद्यकीय प्रवेशासाठी रविवारी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत भौतिकशास्त्र विषयावरील प्रश्न काहीसे अवघड, तर रसायनशास्त्राचे काही प्रश्न गोंधळात टाकणारे होते. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही नीटचा पेपर तुलनेने सोपाच होता, तरीही यंदा प्रवेशाच्या कटऑफमध्ये १ ते २ टक्क्यांपर्यंत घट होईल, असे प्रवेश पूर्व परीक्षेच्या अभ्यासकांनी सांगितले.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) रविवारी पुणे शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दुपारी दोन वाजता परीक्षा सुरू होणार असली, तरी विद्यार्थी व पालकांनी सकाळी लवकर परीक्षा केंद्रावर पोहोचून गर्दी केली. दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत परीक्षा घेण्यात आली. कोरोना नियमांचे पालन करून नीट परीक्षेचे आयोजन करण्यात आले. शहरातील बहुतांश केंद्रीय विद्यालयामध्ये व इतर महाविद्यालयांमध्ये नीट परीक्षेचे केंद्र होते. पुण्यासह देशभरातील २०२ शहरांमध्ये परीक्षा घेण्यात आली. देशभरातील सुमारे १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात पुण्यातून सुमारे २० ते २२ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
विद्यार्थ्यांना इंग्रजीसह प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा देता आली. हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड, तेलुगू, पंजाबी यासह तेरा भाषांमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या. परीक्षेच्या स्वरूपात काही बदल करण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व प्रश्न सोडविण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. मात्र, परीक्षेच्या वेळी प्रथम कोणते प्रश्न सोडवावेत याचे नियोजन करणाऱ्या विद्यार्थ्यांना व यापूर्वी ऑफलाईन पेपर सोडवण्याचा सराव केलेल्या विद्यार्थ्यांना पेपर सोपा गेला.