पिंपरी : येत्या आठवड्यातील सलग सुट्यांमुळे पिंपरी-चिंचवडकरांनी सहलीचे नियोजन केले आहे. दि. १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, दि. १५ एप्रिलला श्रीराम-नवमी, रविवार, तसेच दि. १९ एप्रिलला महावीर जयंतीनिमित्त सुट्या आहेत. त्यामुळे शनिवार व त्यानंतरच्या सोमवारी सुटी घेतल्यास दि. १४ एप्रिलपासून ते १९ एप्रिलपर्यंत सलग सहा दिवस सुटी येणार आहे. अनेक शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना दि. १४ एप्रिलपर्यंतपासून सुट्या आहेत. त्यातच मुलांच्या परीक्षा संपल्या असल्याने मुलांबरोबर पालकही सलग सुटीची मजा घेणार आहेत.महाबळेश्वर, लोणावळा, कोकण, कोल्हापूर, शिर्डी, अष्टविनायक दर्शन अशांसारख्या पर्यटनस्थळांचे बुकिंग करण्यात आले आहे. गावाकडून शहरात स्थायिक होणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे सुटीत गावाकडे जाण्यासाठी अनेकांनी नियोजन केले आहे. सलग सुट्यांमुळे खासगी गाड्यांचे बुकिंग आधीच फुल्ल झाले आहे. खान्देश, मराठवाडा, विदर्भात जाणाऱ्या गाड्यांचे देखील बुकिंग झाले आहे, असे खासगी बस व्यावसायिकांनी सांगितले. सध्या उकाडा खूप जाणवत आहे. सलग सुटी असल्याने गावी जाण्यापेक्षा ट्रीपला जाण्याची तयारी आहे. सर्व नियोजन, बुकिंग आधीच केले आहे, असे गृहिणी स्नेहल सुमंथ म्हणाल्या.(प्रतिनिधी)सलग सुट्यांमुळे खासगी गाड्यांना मागणी आहे. जवळच्या पर्यटनस्थळांना मागणी असून जेजुरी, शिर्डी-शनिशिंगणापूर, शेगाव-आनंदसागर, कोल्हापूर आदी धार्मिक स्थळे, तर लोणावळा, महाबळेश्वर, गणपतीपुळे, कोकण, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, तसेच किल्लेभ्रमंतीसाठी गाड्यांचे आगाऊ बुकिंग केले आहे. - दयाराम क्षीरसागर, व्यावसायिकसलग सुट्यांमुळे गावाकडे जाण्यापेक्षा जवळ पर्यटनस्थळासाठी जास्त बुकिंग आहेत. साधारण एक दिवसात सहल करता येतील, असे नियोजन आहे. जाणे-येणे परवडते, तसेच हवे त्यानुसार प्रवासात बदल करणे सोयीचे असल्याने खासगी गाड्यांचे बुकिंग करणे पसंत केले जाते.- मंगेश भोंडवे, व्यावसायिक
सुट्यांमुळे पिकनिकचे नियोजन
By admin | Published: April 15, 2016 3:43 AM