पुणे : पुरुषोत्तम करंडकच्या ५७ वर्षांच्या इतिहासात न भूतो न भविष्यती असं काही घडलं आहे की, स्पर्धेत सांघिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवूनही केवळ ‘पुरुषोत्तम करंडक’ मिळाला नसल्याने पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी महाविद्यालय (पीआयसीटी) हे डिसेंबरमध्ये होणाऱ्या ‘महाकरंडक’च्या अंतिम फेरीत समाविष्ट होण्याची शक्यता नसल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
पुण्यासह जळगाव, नागपूर, अमरावती, रत्नागिरी आणि कोल्हापूर या केंद्रावर पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा घेण्यात येते. यामध्ये अंतिम फेरीत प्रथम, द्वितीय, तृतीय आणि प्रायोगिक विभागात क्रमांक पटकाविलेल्या एकांकिकांचा महाअंतिम फेरी प्रवेश होतो. ही महाकरंडक स्पर्धा डिसेंबरमध्ये पार पडते.
महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे आयोजित यंदाच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या पुणे केंद्रामध्ये एकही संघ पात्र ठरला नसल्याने करंडक न देण्याचा ऐतिहासिक निर्णय परीक्षकांसह संस्थेने घेतला आहे. त्यामुळे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी महाविद्यालयाने (पीआयसीटी) प्रथम क्रमांक मिळवूनही त्यांना करंडक दिलेला नाही. त्याचा फटका महाविद्यालयाला बसला आहे.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाने (बारामती) दुसऱ्या क्रमांकाचा हरी विनायक करंडक, तर मॉडर्न कला, शास्त्र आणि वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, शिवाजीनगर या महाविद्यालयाने तिसऱ्या क्रमांकाचा संजीव करंडक पटकाविला आहे. या दोन्ही महाविद्यालयांनी करंडक मिळविला असल्याने त्यांना महाअंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे. पीआयसीटी मात्र करंडकाअभावी महाकरंडकात सहभागी होण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
संधी मिळणार की नाही ते शुक्रवारी कळवू
सांघिक प्रथम क्रमांक मिळविलेले पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) हे महाविद्यालय महाकरंडकमध्ये जाईल की नाही हा विचाराचा मुद्दा आहे. आम्ही अजून विचार केलेला नाही. दुसरा व तिसऱ्या क्रमांकाला करंडक दिलेला आहे, पहिल्या क्रमांकाला करंडक दिलेला नाही. त्यामुळे तो महाकरंडकला जाईल की नाही माहिती नाही. संस्थात्मक पातळीवर यावर निर्णय झालेला नाही. आजपर्यंत असे कधी घडलेले नाही. त्यामुळे निर्णय घेऊन शुक्रवारी (दि. २३) आम्ही जाहीर करू. - राजेंद्र ठाकूरदेसाई, चिटणीस, महाराष्ट्रीय कलोपासक संस्था.
नुसतं गप्पं राहून पण चालणार नाही
पुरुषोत्तम करंडकामुळे मला नाटकाची आवड निर्माण झाली. या स्पर्धेने जे प्रोत्साहन दिले ते आजही पुरून उरते. यावर्षी असा निकाल लागला याने फार वाईट वाटलं. हे चूक-बरोबर हा वाद घालून आता काही साध्य होणार नाही, पण नुसतं गप्पं राहून पण चालणार नाही. पुरुषोत्तम २०२२ मध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी मी एक नाट्य कार्यशाळा घ्यायचं ठरवलं आहे. ऑक्टोबरमध्ये ती असेल. याचे तपशील देईनच, पण ही कार्यशाळा मोफत असेल. - निपुण धर्माधिकारी
अनपेक्षित निकालावर गुरुवारी चर्चा
यंदाच्या पुरूषोत्तम करंडक स्पर्धेचा निकाल काहीसा अनपेक्षित लागला. त्यामुळे नाट्यक्षेत्रात उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. या निमित्ताने, या विषयावर गुरुवारी (दि. २२) चर्चासत्र आयोजित केले आहे. त्यात स्पर्धेचे संयोजक राजेंद्र ठाकुरदेसाई (चिटणीस, महाराष्ट्रीय कलोपासक) आणि पौर्णिमा मनोहर (परीक्षक, अंतिम फेरी), प्रवीण भोळे, (विभागप्रमुख, ललित कला केंद्र, पुणे) त्यांचे विचार मांडणार आहेत. सुदर्शन रंगमंच येथे संध्याकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होईल. मिलिंद शिंत्रे सूत्रसंचालन करतील.