पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे २६ नोव्हेंबरला पुण्यात येणार आहेत. त्यांच्या हस्ते पुणे भाजपच्या वतीने विविध विकासकामांचा शुभारंभ आणि महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार असल्याचे समजत आहे. खरे तर ही गलितगात्र झालेल्या भाजपची केविलवाणी धडपड आहे. कारण, महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपच्या १०० नगरसेवकांनी सत्तेच्या काळात काय दिवे लावले आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे, कुणीही आले तरी काहीही फरक पडणार नाही. महानगरपालिका निवडणुकीत हरलेली भाजप आणि जिंकलेली राष्ट्रवादी हेच चित्र दिसून येईल असे मत पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले आहे.
पुणेकरांनी मोठ्या अपेक्षेने २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता दिली. परंतु, सत्ताधारी भाजप आणि भाजपचे नगरसेवक यांच्याकडून नागरिकांच्या पदरी निराशाच पडली आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेली पहिल्या क्रमांकाची महानगरपालिका असे चित्र निर्माण झाले आहे. सत्ताधारी भाजपने २०१७ पासून आतापर्यंत नेहमी आपले अपयश लपविण्याचाच प्रयत्न केला आहे. परंतु, आता हे अपयश उघडे पडले असून, गलितगात्र झालेल्या भाजपची आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केविलवाणी धडपड सुरू आहे.
अमित शाह यांच्या अमोघ वाणीने मते मिळविण्याचा प्रयत्न करणार
''केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे २६ नोव्हेंबर रोजी, संविधान दिनी पुण्यात येऊन महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचे समजते. खरे तर ही गोष्ट आम्ही मजेने घेतो. कारण, कोल्हापूर सोडून पुण्यात तळ ठोकलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने पुणेकर मते देणार नाहीत, नागपूरचे तथाकथित पोलादी पुरुष देवेंद्र फडणवीस यांच्या नावे मते मिळणार नाहीत, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावेही मते मिळणार नाहीत, याची पुरेपूर जाणीव भाजपला झाली आहे. त्यामुळे घाबरलेली भाजप अमित शाह यांना पुण्यात आणून त्यांच्या अमोघ वाणीने मते मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, मतदार पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी आले काय किंवा अमित शहा आले काय अजिबात भुलणार नाहीत असेही ते म्हणाले आहेत.''