पुणे : रस्त्यावर जोरजोरात ओरडून भाजी विक्री करत असल्याच्या वादातून १५ ते २० जणांच्या जमावाने भाजीविक्रेत्यांवर हल्ला करीत मारहाण केली. आरोपीने एकास चाकूने पोटात भोसकल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. फरासखाना पोलिसांनी याप्रकरणात पाच आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांना ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
वाजीद बशीर शेख (वय ३५, रा. ७१५, सरोज अपार्टमेंट, नाना पेठ ), शब्बीर इकबाल टीनवाला (वय३०), इस्माईल शब्बीर पूनावाला (वय ३५), तबरेज इब्राहीम शेख (वय ३६), आणि अल्लाउद्दीन इमामुद्दीन शेख (वय ४०, चौघे रा. रविवार पेठ) अशी अटक केलेल्या आरोपीेंचे नावे आहेत. त्यांच्यासह आणखी १८ जणांविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिरुध्द इनामदार (वय २०,रा. रविवार पेठ रा. ६५०, रविवार पेठ, काची आळी ) याने फिर्याद दिली. पोटात चाकू लागल्याने देवांग सचिन कंट्रोल्लु (वय १९,रा. काची आळी ) हा जखमी झाला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवार पेठेत मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
अटक केलेल्या आरोपीकडे तपास करीत गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक करणे. गुन्ह्यांत वापरलेला चाकू तसेच मारहाण करण्यासाठी वापरलेले इतर साहित्य जप्त करणे, पोलिसांसमोर भाजीविक्रेत्यांना मारहाण झाली असून, त्यामागचे नेमके काय कारण आहे याचा शोध घेण्यासाठी अटक केलेल्या ५ ही आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली.
----------