पुणे : चित्रपटप्रेमींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) शहरातील तीन चित्रपटगृहांमध्ये रंगणार आहे. सिटी प्राइड कोथरूड हे ‘पिफ’चे दरवर्षीचे मुख्य केंद्र नूतनीकरणाच्या कामामुळे बंद असल्याने यंदा सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर, प्रभात रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि कॅम्प परिसरातील आयनॉक्स या ठिकाणी सात पडद्यांवर महोत्सवातील चित्रपट पाहाता येणार आहेत. याशिवाय ऑनलाइन पद्धतीनेही महोत्सवाचा आस्वाद घेता येणार आहे.
पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकार यांच्या वतीने ४ ते ११ मार्च दरम्यान १९ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. दरवर्षीप्रमाणे थिएटर आणि स्क्रीनची संख्या कमी झालेली असली, तरी मर्यादित आयोजनाच्या दृष्टीने फाउंडेशनने यंदा महोत्सवाचे नियोजन केले आहे. सरकारने करोना काळात लागू केलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन चित्रपटगृहात करण्यात येईल. नियमानुसार प्रवेश देण्यात येईल, असे फाउंडेशनने कळवले आहे. या संदर्भातील नियम व अटी www.piffindia.com या संकेतस्थळावर पाहता येतील.
पिफसाठी प्रत्यक्ष आणि ऑनलाइन महोत्सवाच्या नोंदणी प्रक्रियेला उद्यापासून (दि.१६) सुरुवात होत आहे. दोन्हीची नोंदणी प्रक्रिया वेगवेगळी आहे. २५ फेब्रुवारीपासून चित्रपटप्रेमींना थिएटरमध्ये प्रत्यक्ष नोंदणी करता येईल. ऑनलाइन नोंदणीचे सर्वांसाठी ५०० रुपये शुल्क आहे. त्यामध्ये निवडक २६ चित्रपट दाखविले जाणार आहेत. चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठीचे सर्वांसाठी नोंदणी शुल्क ६०० रुपये आहे. यामध्ये १५० चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. मर्यादित जागा उपलब्ध असल्याने चित्रपटप्रेमींनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.