पुणे : देशविदेशातील विविध चित्रपटांचा आस्वाद देणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) उद्यापासून (दि.१८) ऑनलाइन रंगणार आहे. घरबसल्या रसिकांना दर्जेदार कलाकृतींचा अनुभवता घेता येणार असला तरी एकावेळी एकाच डिव्हाईसवर लॉगिन करता येणार असल्याने केवळ एकच व्यक्ती तो चित्रपट पाहू शकणार आहे. चित्रपट पाहणा-या व्यक्तीच्या नावाचा वाटरमार्क दिसणार असल्याने चित्रपटाचे छायाचित्रण तसेच स्क्रीनशॉट घेता येणार नाही. दिवसात चार चित्रपट अपलोड केले जाणार असून एक चित्रपट आठ तासात कधीही पाहता येईल.
पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकार यांच्या वतीने १९ वा ऑनलाइन पिफ २५ मार्चपर्यंत रंगणार असून, महोत्सवात जगातील उत्तम २६ चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. यातील काही सिनेमांना जगातील इतर मोठ्या महोत्सवांमध्ये तसेच ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. नोंदणीला उत्तम प्रतिसाद मिळत असून, किमान एक हजार प्रेक्षक महोत्सवातील चित्रपटांचा आस्वाद घेतील. प्रत्येक चित्रपट केवळ वीस रुपये देऊन जगातील सर्वोत्तम कलाकृती पाहता येणार आहेत, असे ‘पिफ’चे उपसंचालक विशाल शिंदे यांनी सांगितले.
ऑनलाइन चित्रपट दाखवताना पायरसी टाळण्यासाठी कान, बर्लिन, व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय महोत्सवात वापरण्यात आलेल्या न्यूझिलंड येथील ‘शिफ्ट ७२’ या ऑनलाइन प्रणालीचा 'पिफ'च्या निमित्ताने भारतात पहिल्यांदाच वापर होणार आहे. कोणत्याही सॉफ्टवेअरच्या साहाय्याने चित्रपट जतन किंवा चित्रण करणे शक्य होणार नाही.