राजुरी - राजुरी येथील गुरव शेतमळ््यात दोन बिबट्याची पिल्ले आढळल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.राजुरी (ता. जुन्नर) गुरव शेतमळ््यातील बंटी हाडवळे यांच्या शेतात शुक्रवारी ऊसतोडणी चालू होती. या वेळी ऊसतोडणी कामगारांना दोन बिबट्याची लहान पिल्ले आढळली. त्यानंतर बंटी हाडवळे यांनी वनाधिकारी जे. बी. सानप यांना याची माहिती दिली. घटनास्थळी वनखात्याच्या सर्व अधिकाºयांनी भेट दिल्यानंतर आढळलेली बिबट्याची पिल्ले ही ५ ते ६ दिवसांची असून त्यांना दवाखान्यात नेऊन जुन्नर येथील बिबट्या निवारण केंद्रात नेले आहे.ही पिल्ले पाच ते सहा दिवसांची असल्याने त्यांची आई याच शेतात असल्याने या ठिकाणी तिला पकडण्यासाठी वनखात्याने या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच पिंजरा लावला आहे.जुन्नर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढलेले. तसेच तालुक्यात सर्वच ठिकाणी ऊसतोडणी मोठ्या प्रमाणात चालू आहे. अनेक ठिकाणी ऊसतोडणी चालू असताना बिबट्याची पिल्ले आढळू लागली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी ऊसतोडणी बंद केलेली आहे. तसेच तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजुरी गाव बिबटेप्रवण क्षेत्रात मोडत असून या गावात मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत आहे. त्यामुळे या परिसरात पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी वल्लभ शेळके यांनी केली आहे.
राजुरीत सापडली बिबट्याची पिल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 5:02 AM