जुन्नर : जुन्नरमधील कल्याण पेठ परिसरातील सध्या बंद अवस्थेत असलेल्या राजेंद्र आॅइल मिलच्या बंदिस्त आवारात बिबट्याचे वास्तव्य असल्याच्या संशयावरून वन विभाग; तसेच माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रातील कर्मचाºयांनी मंगळवारी सकाळी ११ पासूनच बिबट्याची शोधमोहीम सुरू केली.रात्रीच्या वेळेस बिबट्याचे गुरगुरने कानावर आल्याने मानवीवस्तीस धोका नको म्हणून बिबट्याची खातरजमा करण्यासाठी गेलेल्या कर्मचाºयांना मिलच्या आवारातील बंदिस्त पत्राशेडमध्ये डुकरांच्या टोळीचे वास्तव्य असल्याचे निदर्शनास आले.या मिलच्या बाजूलाच असणारी नागरीवस्ती, वसतिगृहे, शाळा यामुळे येथे बिबट्याचे वास्तव्य असल्याची खबर मिळाल्यावर प्रशासनाने लगेच सावधगिरी बाळगत शोधमोहीम हाती घेतली. तर रात्रीच या मिलमध्ये बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याचे देखील नियोजन करण्यात आले होते. वन विभागाने सकाळीच या ठिकाणी माणसे तैनात ठेवून पाळत ठेवली. तर सायंकाळी माणिकडोह निवारा केंद्राचे डॉ. अजय देशमुख यांनी सहकाºयांसह किमान परिसराची पाहणी करावी म्हणून मिलच्या आवारात प्रवेश केला असता कुत्र्याची दोन पिल्ले मृतावस्थेत सापडली. ही पिल्ले बिबट्याने मारली, अशी आवई उठली होती.परंतु, या कुत्र्याच्या पिल्लांच्या अंगावर कोणत्याही जखमेच्या ओरखडल्याच्या खुणा नसल्याने त्यांना बिबट्याने मारले नसल्याचे निष्पन्न झाले. त्याचवेळी टाकीत पडलेल्या एक कुत्र्याच्या पिलाला या कर्मचारी वर्गाने वाचविले. या मिलच्या आवारात लहानमोठी झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात असल्याने, तसेच कोणाचाही वावर नसल्याने सावधगिरी बाळगत या पथकाने पाहणी केली. येथील वापर नसलेल्या पत्राशेडमध्ये पाहणी केली असता डुकरांच्या टोळीचे वास्तव्य असल्याचे निदर्शनास आले.बिबट्याचे वास्तव्य याठिकाणी असते तर त्याने प्रथम सर्व डुकरे मारून टाकली असल्याचे बिबट्या निवारा केंद्राचे डॉ. अजय देशमुख यांनी सांगितले. बिबट्याचे गुरगुरणे आणि डुकरांचे यात साम्य असल्याने या ठिकाणी बिबट्याचे वास्तव्य असल्याचे गोष्टीला बळ मिळाले होते.गुरगुरण्याचा आवाजया परिसरात राहणारे श्वानप्रेमी व प्राणिशास्त्र विभागाचे एक प्राध्यापक रात्री उशिरा कुत्र्यांना घेऊन फेरफटका मारत असताना या मिलजवळून जात असताना त्यांच्या कानावर मिलमधून प्राण्यांचा गुुरगुण्याचा आवाज आला. याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आल्याने सतर्कता दाखवून ताबडतोब वन विभागाने शोधमोहीम गुप्तता बाळगत हाती घेत खातरजमा केली आणि बिबट्याचे वास्तव्य नसल्याचे निष्पन्न झाल्यावर हुश्श केले.
शोध बिबट्याचा सापडले डुक्कर, जुन्नरच्या बंद मिलमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 2:25 AM