पुणे, दि. 12 - विना चालक बस रस्त्यावर धावण्याचे तंत्रज्ञान विकसित होईल तेव्हा होईल मात्र, पीएमपीएमएलने हा ‘पराक्रम’ करुन दाखवला आहे. पिंपळे गुरव येथील बस स्थानकामध्ये उभी असलेली एक बस चक्क विना चालक सुरु झाली आणि 100 मीटर पुढे गेली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी अथवा कोणतीही जिवीतहानी हानी झाली नाही, मात्र, रस्त्यावरील दुचाकी आणि एका गॅरेजचे मात्र नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास पिंपळे-गुरव बस स्थानकामध्ये घडली. तसेच, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस मार्केटयार्डवरुन पिंपळे-गुरव बस स्थानकामध्ये आली होती. चालक आणि वाहक फेरीची नोंद करण्यासाठी आगार कक्षामध्ये गेले होते. बसच्या बॅटरीमध्ये बिघाड असल्याने चालकाने बसचे इंजीन सुरुच ठेवलेले होते. थोडा वेळ जागेवर स्थिर उभी असलेली बस अचानक पुढे जाऊ लागली. त्यावेळी बस स्थानकामध्ये बस जात येत होत्या. समोरील रस्त्यावरुन पादचारी आणि वाहनांची वर्दळही सुरु होती. ही बस तशीच पुढे रस्त्यावर गेली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकींना धडक देत बस समोरच्या बाजूला असलेल्या एका गॅरेजला जाऊन धडकली. गॅरेजला धडकलेली बस थांबल्यावर हा सर्व प्रकार लक्षात आला. दरम्यान, विनाचालक जात असलेल्या बसमुळे अनेकांच्या हृदयात धडकी भरली. बेजबाबदारपणे बस सुरु ठेवून हलगर्जीपणा दाखविल्याप्रकरणी संबंधित चालक व वाहकावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
विनाचालक बस चालविण्याचा पीएमपीचा ‘पराक्रम’, पिंपळे गुरवमधील थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 9:34 PM