मंगेश पांडे, पिंपरी ‘उठा पांडुरंगा आता, दर्शन द्या सकळा’ या अभंगासह काकडारती झाल्यानंतर श्रीक्षेत्र देहूतील देऊळवाड्यात होणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणी महापूजेला विशेष महत्त्व आहे. रोज पहाटे होणारी विधिवत पूजा ही महापूजाच संबोधली जाते. पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी काकडारतीने धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होते. भगवंताला जागे करण्यासाठी काकडारती म्हटली जाते. ‘उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा’याप्रमाणे अठरा अभंग गायले जातात. पुजारी, विणेकरी, सेवेकरी व भाविक या वेळी हजर असतात. त्यानंतर लगबग सुरू होते महापूजेची. पहाटे सव्वापाच वाजता सुरुवातीला शिळामंदिरात तुकोबारायांची महापूजा केली जाते. त्यानंतर राम मंदिरातील राम, लक्ष्मण, सीता यांची पूजा होते. साडेपाचला श्री विठ्ठल-रुक्मिणी स्वयंभू मूर्ती महापूजेला सुरुवात होते. ही पूजा भाविकांच्या हस्ते केली जाते. भगवंताची महापूजा म्हणजे एक अनुपम सोहळाच असतो. दीड तास चालणाऱ्या या पूजेसाठी १३ प्रकारच्या वस्तू वापरल्या जातात. सुरुवातीला मंत्रोच्चारात विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर जलाभिषेक केला जातो. त्यानंतर दही, दूध, तूप, मध, केळी या पंचामृताने स्रान घातले जाते. दोन्ही मूर्ती मखमली वस्त्राने पुसल्या जातात. पुन्हा भगवंताच्या डोक्यावर दूध आणि पायावर दही, केळी, मध लावले जाते. त्यानंतर येथे असलेल्या मोठ्या शंखात शुद्ध पाणी घेऊन त्याने दोन्ही मूर्तींना स्नान घातले जाते. मूर्ती मखमली वस्त्राने स्वच्छ केल्यानंतर अत्तर लावून भगवंताला नवीन वस्त्र परिधान केले जातात. विठ्ठलाच्या कपाळावर चंदनाचा गंध, त्यावर अबीर आणि रुक्मिणीमातेच्या कपाळावर कुंकवाचा गंध लावून मुकुट, दागिने चढविले जातात. गणपती, पांंडुरंग, ज्ञानेश्वरमहाराज, तुकाराममहाराज यांची आरती होते. हा अनुपम सोहळा चौघडा, झांज या वाद्यांच्या गजरात पार पडतो. श्री विठ्ठल-रुक्मिणीची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली, त्या वेळी मूर्तीजवळ तुळशी आणि अबीर होते. त्यामुळे तुळस आणि अबीर भगवंताला प्रिय असल्याची भाविकांची भावना आहे. त्यामुळे भगवंताला तुळशीहार घालण्याची प्रथा आहे. (क्रमश:)महापूजेनंतर विठ्ठल-रुक्मिणीला दररोज नवीन वस्त्र परिधान केले जाते. पांडुरंगाला अंगरखा, उपरणे व सोवळे, तर रुक्मिणीला चोळी आणि सहावार साडी असा पोशाख असतो. सणासुदीच्या दिवशी पांडुरंगाला पिवळ्या रंगाचे उपरणे आणि रुक्मिणीला हिरव्या रंगाची साडी घातली जाते. वर्षभरात सुमारे १७० महापूजा होतात. तीन ते चार पिढ्यांपासून महापूजा करणारे कुटुंब आहेत. यामध्ये पुण्यासह, मराठवाडा, विदर्भ, कोकण या भागातील कुटुंबांचा समावेश आहे. दर वर्षी ठरलेल्या तिथीला ते आदल्या दिवशीच मंदिरात हजर असतात. त्यानंतर दैनंदिन पूजादेखील असतात.
गेल्या सात वर्षांपासून नित्यनेमाने देऊळवाड्यात महापूजा करीत आहे. दीड ते दोन तासांच्या कालावधीत संपूर्ण विधिवत पूजा केली जाते. भगवंताची सेवा करताना प्रसन्न आणि समाधानी वाटते.
- धनंजय मोरे, पुजारी.