शिक्रापूर : दोन महिन्यांपासून तब्बल चार शिक्षकांची पदे रिक्त असल्याने पिंपळे-खालसा जिल्हा परिषद शाळेला संतप्त ग्रामस्थांनी आज थेट कुलूप ठोकले. गेल्या दोन महिन्यांपासून शाळेला चार शिक्षक नसल्याने ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला.पिंपळे-खालसा जिल्हा परिषद शाळा म्हणजे शिरूर तालुकाच नव्हे तर जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेतील विक्रमी निकालासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या ४० वर्षांत शाळेतील ३८४ विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षा आणि शाळेच्या बाबतीत ग्रामस्थ संवेदनशील आहेत. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत असून, शाळेत शिक्षकपट ९ व एक मुख्याध्यापक आहे. शाळेतील तीन शिक्षकांच्या बदल्या जूनमध्ये झाल्या आणि तिघांनीही शाळेचा पदभार सोडला. एका शिक्षिकेची शाळेत नव्याने नियुक्ती झाली आणि त्यांना अपघात झाल्याने त्या शाळेत रुजूच झाल्या नाही. पर्यायाने सध्या रिक्त असलेल्या चारही जागांवर नवीन शिक्षकच रुजू झाले नाहीत. याबाबत ग्रामस्थांनी पंचायत समिती स्तरावर तसेच जिल्हा परिषद यांचेकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, त्याची दखल घेतली गेली नसल्याने ग्रामस्थांनी सर्व शिक्षकरुजू होईपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. सकाळी साडेअकरा वाजता शाळेला ग्रामस्थांनी कुलूप लावले. दरम्यान, दुपारी गट शिक्षणाधिकारी यांनी शाळेला भेट देऊन ग्रामस्थांची भेट घेऊन मंगळवारपर्यंत शिक्षक देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी शाळा उघडली. (वार्ताहर)इमारतीसाठी दीड कोटींची लोकवर्गणी पिंपळे-खालसा शाळेची शिष्यवृत्तीची परंपरा आणि शाळेसाठी ग्रामस्थांचे योगदान हेही जिल्ह्यासाठी आदर्श आहे. गावाकडून सध्या दीड कोटीच्या लोकवर्गणीतून चार मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. गावतली शाळा गावासाठी सर्वस्व असल्याची ग्रामस्थांची भावना आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षांत पहिल्यांदाच अशी विचित्र स्थिती उद्भवली असल्याने ग्रामस्थांकडून जिल्हा परिषद प्रशासनाविरोधातच रोष व्यक्त होत आहे.
पिंपळे-खालसा शाळेला टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2016 5:24 AM