पुणे : कुकडी पाटबंधारे विभाग अंतर्गत असलेले पिंपळगाव जोगे उपविभागीय कार्यालय पारनेर तालुक्यातील आळकुटे येथे हलविण्यास जुन्नर , आंबेगाव तालुक्यातील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. यासाठी राष्ट्रवादी कौंग्रेस चे अतुल बेनके यांचे तीन दिवसांपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. बेनके यांना मिळणारा पाठिंबा लक्षात घेत आ. सोनवणे यांनी ही हे कार्यालय हस्तांतरास विरोध करत बुधवारी रात्री उशिरा कार्यकर्त्यां सह पिंपळगाव जोगा धरणातून सुरू असलेले आवर्तन बंद केले. जो पर्यंत कार्यलय पुन्हा जुन्नरला देत नाही तो पर्यंत पाणी देणार नाही अशी भूमिका घेत पाणी बंद केले. इतरही धरणातून अहमदनगर ला जाणारे पाणी बंद करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यामुळे दोन्हीं जिल्यातील पाणी वाद आता पेटणार आहे.
कुकडी प्रकल्पाच्या पिंपळगाव जोगे उपविभाग कार्यालय पारनेर येथे आणणार असे आश्वासन खा. सुजय विखे पाटील यांनी दिले होते. त्यानुसार येथील कार्यालय बुधवार पासून हलविण्यात आले. या निर्णयाला संपूर्ण जुन्नर , आंबेगाव , शिरूर तालुक्यातून मोठा विरोध होत आहे. राष्ट्रवादी चे अतुल बेनके यांनी या विरोधात तीन दिवसांपासून आंदोलन छेडले आहे. त्यांना जवळपास 42 गावांनी तसेच विविध पदाधिकारी यांनी पाठींबा दिला आहे. या सोबतच जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनीही कार्यालय हलविण्यास विरोध करत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते.
यानंतर आज आमदार शरद सोनवणे यांनीही या वादात उडी घेत थेट पिंपळगाव जोगा धरणावर जात पारनेरला जाणारे आवर्तनाचे पाणी बंद केले. पुणे जिल्ह्यातील पाटबंधारे खात्याची मुख्य अभियंता हे कार्यालय नगरला हलविण्याचा डाव आखण्यात आला असून त्याला मोठा विरोध होत आहे. सोनवणे म्हणाले, आमचे कार्यालय हलविण्यास जुन्नरमधून जाणारे पाणी बंद करण्यात येईल. तसेच मोठं आंदोलनं छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.