पिंपळसुटी या गावासाठी मांडवगण फराटावरून अतिशय जवळचा मार्ग असलेल्या पिंपळसुटी -मांडवगण फराटा रस्त्यावर खूप खोल खड्डे पडलेले आहेत. येथील तांबेवस्तीनजीक असलेला एक किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे. या रस्त्यावर साधारणतः एक ते दीड फुटाचे खोल खड्डे पडले आहे. यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवासीवर्गाचे खूप हाल होत आहे. तसेच, या ठिकाणी रस्त्याच्या शेजारील शेतकऱ्यांनी दोन्ही बाजूंनी अतिक्रमण करून सऱ्या पूर्णपणे बुजवलेल्या आहेत. याठिकाणी दोन वाहने एकमेकांना साईडसुद्धा देऊ शकत नाही एवढा हा रस्ता अरुंद आहे. मांडवगण फराटापासून अकरावा मैलापर्यंत रस्ता डांबरीकरण केलेला आहे. तसेच, येथील कॅनलवर मोठा पूल बांधण्यात आलेला आहे. पिंपळसुटी, वांगदरीनगर या भागातील नागरिकांना हा रस्ता दौंड-बारामती या भागाकडे जाण्यासाठी जवळचा रस्ता असल्यामुळे सोलापूर -पुणे महामार्ग याकडे जलद गतीने जाण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. पिंपळसुटी गावातून महामार्गाचे चौपदरीकरण काम चालू आहे. त्यामुळे या रस्त्याला खूप महत्त्व आहे.
या रस्त्यावर खूप मोठी प्रवासी वर्दळ असते. सकाळ-सायंकाळ या भागातून गवळी या रस्त्याचा वापर करत असतात. परंतु रात्रीच्या वेळी खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे छोटे-मोठे अपघात घडलेले आहेत. त्यात वाहन चालकाची तू तू मै मै.. या रस्त्यावर नेहमीच होत असते. खड्ड्यांमुळे लहान चारचाकी वाहनांचे नुकसान होत आहे. या रस्त्यावर असलेले खड्डे आणि अतिक्रमण याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर खड्डे बुजवणे आवश्यक आहे.
पिंपळसुटी-मांडवगण फराटा रस्त्यावर झालेले अतिक्रमण आणि खोल पडलेले खड्डे.