पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरामध्ये गुन्हेगारी क्षेत्रात वाढ होत चालली आहे. कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण केल्याचे धक्कदायक प्रकार घडत आहेत. सद्यस्थितीत संचारबंदीत पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना सायंकाळी सहानंतर व्यवसाय बंद करण्यास सांगितल्यावरून चार फेरीवाल्यांनी धक्काबुक्की करून पोलिसांना मारहाण केली आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून पोलिसांनी दोन फेरीवाल्यांना अटक केली आहे. चिखली येथे शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.
मोहम्मद इरफान अब्दुलहन्नान बागवान (वय २४), मोहम्मद इमरान अब्दुल रहेमान शेख (वय २२, दोघेही रा. चिखलीगाव), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह दोन विधीसंघर्षीत बालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक दीपक भानुदास मोहिते यांनी शुक्रवारी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने बंद करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार फिर्यादी हे दुकानदारांना दुकाने बंद करण्यास सांगत होते. या कारणावरून आरोपींनी पोलिसांशी हुज्जत घातली. धक्काबुक्की करत पोलिसांना मारहाण केली.