पिंपरी : उन्हाच्या झळा वाढल्या असून आज तापमान ४०.८ अंश सेल्सिअसवर गेले होते. परिणामी नागरिकांनी दुपारी घराबाहेर न पडणे पसंत केले. त्यामुळे शहरातील रस्ते दुपारी ओस पडले होते. सुटीमुळे सायंकाळी गर्दी होऊन कॅम्प परिसरातील बाजारात वाहतूककोंडी झाली होती.
पिंपरी कॅम्पात रविवारी सायंकाळी वाहतूककोंडी झाली. रेल्वे स्टेशन येथील इंदिरा गांधी उड्डाणपुलावर कोंडी झाली होती. पुलावरून शगुन चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच भाटनगरकडे जाणाऱ्या मार्गावरही अशीच परिस्थिती होती. शगुन चौकातून साई चौकाकडे आणि रिव्हररोड तसेच काळेवाडी आणि पिंपरीगावाकडे जाणाºया मार्गावरही वाहनांच्या रांगा होत्या. कापड बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. फळविक्रेते आणि अन्य व्यावसायिकांनी रस्त्यातच अतिक्रमण केल्याने कोंडीत भर पडली. काळेवाडी, पिंपरीगाव आणि साई चौक तसेच शगुन चौकातून येणाºया वाहनांची संख्या जास्त असल्याने या मार्गावर वाहतूककोंडी झाली होती. शगुन चौकातील सिग्नल बंद होते. पिंपरी कॅम्प, शगुन चौक, रिव्हररोड, भाटनगर या परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. बेशिस्त वाहनचालक आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.वाहतूक पोलीस, वॉर्डनची दमछाकपिंपरी कॅम्पातील साई चौकात वाहतूककोंडी झाली होती. महामार्गाकडे जाण्यासाठीच्या भुयारी मार्गातही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची आणि वॉर्डनची दमछाक झाली. त्यांच्या मदतीला काही नागरिक धावून आले आणि त्यांनी वाहतूक नियमनासाठी सहकार्य केले.