बावडा : पिंपरी बुद्रुक येथील शासकीय तूर खरेदी केंद्रात आजपर्यंत १२५ टन एवढी तुरीची आवक झाली आहे. श्री लक्ष्मी-नृसिंह शेतकरी उत्पादक कंपनीने खरेदी केलेल्या तुरीची रक्कम महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी प्रकल्पाच्या प्रकल्प संचालिका संपदा मेहता यांच्या हस्ते मंगळवारी पुणे येथे कंपनीच्या संचालक मंडळाकडे सुपूर्त करण्यात आली.नुकतेच राज्यातील पहिले असणारे तूर खरेदी केंद्र इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथील श्री लक्ष्मी-नृसिंह शेतकरी उत्पादक कंपनी लि. हे आहे. या तूर खरेदी केंद्रात आजपर्यंत १२५ टन एवढी तुरीची आवक झाली आहे. यातील पहिल्या दोन दिवसांत खरेदी केलेल्या तुरीची रक्कम धनादेशाद्वारे कंपनीच्या संचालक मंडळाकडे सुपूर्त करण्यात आली. ही रक्कम शेतकऱ्यांना तातडीने शेतकऱ्यांना देण्याची व्यवस्था उत्पादक कंपनीकडून करण्यात आली आहे. या वेळी अधिकारी अनिलकुमार शितोळे, योगेश थोरात, तसेच श्री लक्ष्मी-नृसिंह शेतकरी उत्पादक कंपनीचे सीईओ विजय सुतार, अध्यक्ष शहाजी सूळ व इक्बाल शेख उपस्थित होते.इंदापूर तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपनी हे शासनाचे अधिकृत खरेदी केंद्र आहे. ते घोडदौडीच्याबाबतीत राज्यात अग्रेसर असल्याचे कंपनीचे सीईओ विजय सुतार व अध्यक्ष शहाजी सूळ यांनी सांगितले.या शासकीय खरेदी केंद्रावर इंदापूर तालुक्यासहित माळशिरस, फलटण, बारामती, दौंड, माढा, मंगळवेढा, पंढरपूर आदी ठिकाणांहून तुरीची आवक होत आहे. त्यामुळेच आगामी काळात शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरण्यास पात्र ठरणार आहे. किमान यामुळे शेतकऱ्यांचा नफाच होणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सध्याच्या व्यवस्थेत शेतकरी भरडला जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या, व्यापारी, दलाल यांच्याकडून शेतकऱ्यांना बेसुमार चिरडलेच जात आहे. त्याचबरोबर एवढे होऊनही शेतकऱ्यांच्या हातात वेळेत पैसा नाही. याच व्यवस्थेला कंटाळून शेतकऱ्यांनी उत्पादक कंपन्यांवर विश्वास दाखवला आहे. (वार्ताहर)
पिंपरी केंद्रात १२५ टन तुरीची आवक
By admin | Published: January 12, 2017 1:56 AM