पिंपरी : शहरातील आणखी १३ पोलीस कोरोना ‘पाॅझिटिव्ह’ झाले. यात सहा अधिकारी सात कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांचा तपासणीचा अहवाल बुधवारी (दि. १२) प्राप्त झाला. त्यामुळे यंदाची नववर्षातील कोरोना पाॅझिटिव्ह पोलिसांची संख्या ६५ झाली आहे. या सर्व पोलिसांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
कोरोना महामारीच्या पहिल्या टप्प्यात १५ मे २०२० रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आजपर्यंत ९९७ पोलिसांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला. त्यातील पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर ९२७ पोलिसांनी कोरोनावर मात केली. गेल्या वर्षी पोलीस दल कोरोनामुक्त झाले होते. दरम्यान डिसेंबर अखेरीस शहरात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळू लागले. त्यात पोलिसांनाही संसर्ग झाला.
पाच पोलीस रुग्णालयात
कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या एक अधिकारी व चार कर्मचारी, अशा पाच पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून १० ते १२ पोलिसांना सौम्य लक्षणे आहेत. उर्वरित पोलिसांना कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून आलेली नाहीत. त्यामुळे त्यांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे.
दहा दिवसांचे विलगीकरण
कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या विलगीकरणाबाबत शासनाने नव्याने मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार १० दिवस विलगीकरण आवश्यक आहे. त्यानुसार लक्षणे नसली तरी, पोलिसांचे विलगीकरण करण्यात आले आहे.
कोरोना बाधित पोलीस
अधिकारी - १८कर्मचारी - ४७