पिंपरी : निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना पॉलिसी काढण्याचे अमिष दाखवून दोन कोटी ३० लाख ८ हजार ८९८ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी तीन संशयितांना पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी दिल्ली व पुण्यातून अटक केली.
लक्ष्मणकुमार पुनारामजी प्रजापती (रा. पुणे), भुपेंदर जिवनसिंग जिना, लक्ष्मण सिंग हरेंदर सिंग (दोघेही रा. दिल्ली), अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी इन्शुरन्स कंपन्यांमधून बोलत असल्याचे सांगून एका व्यक्तीला पाॅलिस काढण्यास सांगितले. तसेच मोठी पाॅलिसी जमा होणार असून त्यासाठी चार्जेस म्हणून पैसे भरावे लागतील, असे सांगून पैसे घेतले. त्यानंतर एनपीसीआय, आयआरडीए, दिल्ली फायनानस्स मिनिस्ट्रीमधून बोलत असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर संबंधित व्यक्तीची दोन कोटी ३० लाख आठ हजार ८९८ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी संबंधित व्यक्तीने पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सायबर पोलिसांनी तपास सुरू केला.
फिर्यादी व्यक्तीने एक कोटी ६१ लाख ४० हजाराची रोकड पुणे परिसरातील लक्ष्मणकुमार प्रजापती याच्याकडे दिली होती. सायबर पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणानुसार लक्ष्मणकुमार प्रजापती हा पुणे परिसरात शनिवार पेठ येथे सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली. त्याच्याकडून १० लाखांची रोकड, पैसे मोजण्याची एक मशीन व इतर कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली. त्याला २२ जानेवारी २०२५ रोजी अटक केली.
दरम्यान, या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी दिल्ली व फरीदाबाद येथे पोलिसांनी तपास सुरू केला. संशयित भूपेंद्र जिना व लक्ष्मण सिंग यांना दिल्लीमध्ये पकडले. त्यांनी या फसवणुकीचा गुन्हा कबूल केला. त्यांच्याकडील मोबाइलमध्ये एनपीसीआय अधिकारी असल्याचे ओळखपत्र मिळाले. पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी या प्रकरणात आणखी तपास सुरू केला असून, यापूर्वीही भारतातील अनेक व्यक्तींची फसवणूक केली असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, वैभव पाटील, प्रकाश कातकाडे, विद्या पाटील, पोलिस अंमलदार दीपक भोत्तले, हेमंत खरात, नितेश बिच्चेवार, अतुल लोखंडे, सौरभ घाटे, श्रीकांत कबुले, विशाल निचित, दीपाली चव्हाण, प्रिया वसावे, भाविका प्रधान यांच्या पथकाने ही कामगिरी केली.