पिंपरी: उपमहापौर तुषार हिंगे यांनी बुधवारी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला आहे. महापौर उषा ढोरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्त केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार हिंगे यांनी राजीनामा दिला आहे.
महापालिका प्रभाग क्रमांक दहा शाहूनगर, म्हाडा, संभाजीनगर प्रभागातून तुषार हिंगे भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. पहिल्यांदाच ते निवडून आले होते. भाजपने त्यांना क्रीडा समितीचे सभापतीपद देखील दिले होते. सभापती असतानाच २२ नोव्हेंबर २०१९ रोजी हिंगे यांना उपमहापौरपद मिळाले. एकाचेवळी त्यांच्याकडे दोनही पदे होती. उपमहापौर होऊन त्यांना ११ महिने पूर्ण झाले होते. ............कारण गुलदस्त्यात....
उपमहापौर तुषार हिंगे यांनी अचानक का राजीनामा दिला याचे कारण गुलदस्त्यात आहे . हिंगे यांच्याबाबत काही जणांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांना फोन केला. हिंगे यांचा उपमहापौरपदाचा तत्काळ राजीनामा घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार हिंगे यांनी पदाचा राजीनामा महापौरांकडे दिला असल्याचे विश्वसनीयरित्या समजते.