पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागले असून जपान, बँकॉक आणि दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तिघांना तसेच त्यांच्या संपर्कातील एकास ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्यामुळे शहरातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २२ वर पोहोचली आहे. तर १३ जण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी शहरात आलेल्या तीन जणांचा ओमायक्रॉन अहवाल डिसेंबर महिन्यांच्या पहिल्या आठवडयात पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर शहरात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आलेले आहेत.
मागील महिन्यांपासून परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी ३१ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्या संपर्कातील ३६ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. या रुग्णांच्या घशातील द्रवाची नमुने राष्ट्रीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यावरून शहरांमध्ये चार आठवडयात २२ रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळले आहेत. परदेशातून आलेल्या १३ आणि त्यांच्या संपर्कातील ९ जणांना ओमायक्रॉनची लागण झालेली आहे.
लहान मुलांचाही समावेश
बुधवारी आढळलेल्या चार रुग्णांमध्ये दोन महिला, एक पुरुष आणि एक लहान मुलाचा समावेश आहे. यातील एक जण बँकॉकहून आलेला आहे. तर एक जण जपानमधून तर एक जण दक्षिण आफ्रिकेतून आलेला आहे. तसेच रँडम तपासणीमध्ये एक जणांचा अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आलेला आहे. सर्व रुग्ण भोसरीतील महापालिका रूग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांनी काही लक्षणे आढळल्यास तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय विभागाचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.