पिंपरी : सोशल मीडियावर सेलिब्रिटींना फॉलो आणि लाईक करायचे काम असल्याचे सांगत महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर टास्क देऊन महिलेची सहा लाख ९३ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. जोतिबानगर, काळेवाडी येथे १८ ते २२ एप्रिल या कालावधीत ही घटना घडली.
रवी विक्रम खुणे (वय ३६, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आदिती नावाच्या महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादीला फोन करून ती एका कंपनीची व्यवस्थापक असल्याचे सांगितले. इंस्टाग्रामवर सेलिब्रिटींना फॉलो व लाईक करायचे पार्ट टाईम काम आहे. तसेच टेलिग्रामवरील काही टास्क पूर्ण केल्यास त्याचा आर्थिक मोबदला मिळेल असे आमिष दाखवत फिर्यादीचा विश्वास संपादन केला. प्रीपेड टास्क पूर्ण करताना चूक झाल्याने व्हीआयपी अपग्रेडेशनसाठी तसेच करासाठी (टॅक्स) फिर्यादीकडून आरोपी महिलेने सहा लाख ९३ हजार ५०० रुपये घेऊन फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.