पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. पुण्यासहीत पिंपरी चिंचवडकडे एक विकसित शहर म्हणूनच पाहिले जाते. परदेशातूनही नागरिक या शहराला भेट देण्यासाठी येत असतात. परंतु सद्यस्थितीत या स्मार्ट सिटीतील समस्यांनी नागरिक त्रस्त झाले असून महापालिका स्वतःचे खिसे भरण्यातच व्यस्त असल्याचा आरोप पार्थ पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार नागरी समस्यांकडे लक्ष देताना दिसून येत आहेत. तर ट्विटरच्या माध्यमातून रोजगारी, शेतकरी, देशातील समस्येवर भाष्य करत आहेत. सध्या त्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील समस्यांवर लक्षकेंद्रित केले आहे.
''शहरातील खड्डे, वाहतूककोंडी, अदृश्य सिग्नल, भीषण अपघात अशा समस्या शहरात निर्माण झाल्या आहेत. या स्मार्ट सिटीत नागरिकांना अशा समस्यांना सामोरे जावे लागते. हि तर महापालिकेने विकासाच्या नावाखाली नागरिकांची केलेली फसवणूक असल्याचे ते म्हणाले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका शहराचा विकास करण्याचे सोडून स्वतःचे खिसे भरण्यात व्यस्त असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.''
कोरोना सुरक्षा कवच योजनेसाठी राखून ठेवलेला निधी पीसीएमसी महापालिकेकडून कार्यक्रमांसाठी वळवला
''कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबांसाठी असलेल्या कोरोना सुरक्षा कवच योजनेसाठी राखून ठेवलेला निधी पीसीएमसी महापालिकेकडून सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वळवला जात असल्याची धक्कादायक बाब आहे. कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नाही. महापालिकेचे हे पाऊल बेफिकीर आणि निंदनीय आहे. असेही ते म्हणाले आहेत.''