पिंपरी :सध्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील पाटणकर बाई ही भूमिका चांगलीच गाजत आहे. त्यामुळे साहजिकच ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर देखील सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र,पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या पवनाथडी जत्रेच्या उद्घाटनाला बुधवारी ( दि.४) काही मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र उद्घाटन सोहळयाच्या निमंत्रण पत्रिकेत ‘रात्रीस खेळ चाले ’ मधील अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर यांची ‘ विशेष आकर्षण ’ असा उल्लेख केल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनावर टीकेची चौफेर उठवली जात आहे. महिलाच्या व्यासपीठावर महिला कलावंतांची अवहेलना करणे योग्य नाही अशा प्रकारची टीकेचा सूर आळवला जात आहे. पिंपरी चिंचवड महानागरपालिकेच्या वतीने आयोजित पवनाथडी जत्रा उद्घाटन कार्यक्रम पत्रिकेत अपूर्वा नेमळेकर यांचा उल्लेख ‘विशेष आकर्षण ’ असा केला होता. विशेष आकर्षण या शब्दाला काहीं जणांचा आक्षेप आहे. महिलांच्या व्यासपीठावर महिला कलाकाराचा अवमान करणे योग्य नाही, अशी टीका होत आहे.महापालिकेच्या जनता संपर्क विभागाच्या वतीने निमंत्रण पत्रिका छापण्याचे काम केले जाते. निमंत्रण पत्रिकांमध्ये प्रोटोकॉल पाळला जात नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर आता महिला कलावंताबाबत वापरण्यात आलेल्या ' विशेष आकर्षण ' या विशेषणाने जनता संपर्क विभाग अडचणीत आला आहे.अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर यांच्याशी याबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संवाद होऊ शकला नाही.
याबाबत महापौर महापौर उषा ढोरे म्हणाल्या, विशेष आकर्षण म्हणजे, चित्रपट मालिका यातील कलावंतांबद्दल आपल्याला आकर्षण असते. त्याअनुषंगाने वापरला असेल. पत्रिका तयार करण्याचे काम पदाधिकारी करीत नाहीत. तर प्रशासन करते. माझ्यामते विशेष आकर्षण ऐवजी प्रमुख पाहुणे असा उल्लेखही उचित ठरला असता.