पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूकीचा प्रारूप आराखडा अजून जाहीर झालेली नाही. निवडणूक आयोगाने ६ जानेवारीपर्यंत महापालिकेला सांख्यिकी माहितीची पूर्तता करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सूचना आणि हरकती आणि आरक्षण जाहिर होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पिंपरी-चिंचवडची महापालिका निवडणुक फेब्रुवारी - मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र, ओबीसी आरक्षणावरून निवडणुका वेळेत होतील की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. इतर मागासवर्गींयांंच्या आरक्षणाच्या मुद्दयांवर महापालिकेच्या निवडणुका वेळेत होतील की नाही, याबाबत चर्वितचर्वण सुरू असतानाच आणि राज्य विधिमंडळाने इम्पिरिकल डेटा मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव मंजूर केला आहे. दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम राबविण्याची तयारी सुरू केली आहे. ओबीसी आरक्षण वगळता इतर माहिती मागविली आहे. ६ जानेवारीला पिंपरी - चिंचवड महापालिकेला माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सनस यांनी आदेश जारी केले आहेत.
राज्य शासन त्रिस्तरीय चाचणी करून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे प्रमाण निश्चित करीत नाहीत, तोपर्यंत नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी कोणत्याही जागा राखीव राहणार नाही. सर्व प्रभागांना सर्वसाधारण महिलांचे आरक्षण उपलब्ध होण्यासाठी सोडत काढण्याच्या प्रक्रियेत बदल केला आहे. त्यासाठी अनुसूचित जाती - जमाती लोकसंख्या, अन्य सांख्यिकी माहितीसह प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना केल्या आहेत.
एकूण ४६ प्रभागांत सर्वसाधारण महिला प्रवगार्साठी आरक्षित जागा निश्चित करून देण्यासाठी संबंधित माहिती मागविली आहे. या संदभार्तील माहिती राज्य निवडणूक आयोगाला सादर झाल्यानंतर प्रभाग रचनेचा कार्यक्रम लगेचच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर हरकती आणि सूचना मागवून प्रभागरचना अंतिम केली जाईल. त्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागेल. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.खुल्या गटासाठी ११४ जागा
यंदा १३९ जागांसाठी निवडणुका होतील. त्यात २२ जागा अनुसूचित जाती, ३ जागा अनुसूचित जमातीसाठी, तर ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आल्याने ३८ जागांचा समावेश खुल्या प्रवर्गात केला जाणार आहे. त्यामुळे यापूर्वी खुल्या प्रवर्गात असलेल्या जागांची संख्या आता ११४ वर पोहोचली आहे.