पिंपरी : मुळा नदी सुधार योजना राबविताना वृक्षतोड होत असून, पुनरुज्जीवन होत नसल्याने पर्यावरणवादी संघटनांनी विरोध दर्शविला आहे. नदी वाचविण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे सरसावल्यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारही सरसावले आहेत. पिंपरीतील कार्यक्रमात मुळा नदीकाठच्या वृक्षतोडीबाबत महापालिका, जलसंपदा आणि पर्यावरणप्रेमींसोबत बैठक घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी बुधवारी दिले.
पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमेवरून वाहणाऱ्या मुळा नदी सुधार प्रकल्पाविरोधात पर्यावरणवादी संघटनांनी एल्गार पुकारला आहे. सुशोभीकरण नको, पुरुज्जीवन करा, या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्यात सत्ताधारी आमदार अमित गोरखे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे उतरले आहेत. जागृती आणि जनक्षोभ वाढत आहे, हे लक्षात येताच खासदार बारणे यांनी ‘काम तूर्तास थांबवा’ अशा सूचना केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री पवार यांनीही वृक्षतोड आणि मुळा नदी प्रकल्पाबाबतच्या तक्रारीविषयी दखल घेतली आहे. पिंपरी- चिंचवडच्या दौऱ्यावर असताना मुळा नदीकाठी वृक्षतोड सुरू असून पर्यावरणवाद्यांचे म्हणणे महापालिका ऐकून घेत नाही, असे पत्रकारांनी सांगितल्यानंतर पवार म्हणाले की, ग्लोबल वॉर्मिंगचे हे संकट आहे, सर्वांनी काळजी घ्यायला हवी. आपल्याकडे वृक्षतोड रोखायला हवी. नदी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
भविष्यात पाण्याचे संकट
सरकार म्हणून आम्ही नदी सुधार योजना राबवत आहोत. पण भविष्यात पाण्याचे संकट आपल्यासमोर उभे ठाकणार आहे. त्या अनुषंगाने एक धोरण आणत आहोत. पहिल्यांदा पिण्यासाठी, नंतर शेतीला आणि त्यानंतर औद्योगिक वसाहतींना पाणी असे आपण ठरवले आहे. मुळा नदीकाठच्या वृक्षतोडीबाबत आणि नदीसुधारबाबत पर्यावरणवाद्यांचे मत जाणून घेतले जाईल. महापालिका, जलसंपदा विभाग आणि पर्यावरणप्रेमींसोबत बैठक घेतली जाईल. त्यानुसार प्रकल्प राबविला जाईल.