पिंपरी : नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष होण्याचा बहुमान मिळवला. पिंपरी-चिंचवडचे पोलीसआयुक्त कृष्ण प्रकाश यांनी त्याच पार्श्वभूमीवर बायडेन यांचे खास शैलीत अभिनंदन केले आहे. त्यापाठीमागचे कारण हे तितकेच खास आणि महत्वपूर्ण आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी जो बायडेन यांनी उपराष्ट्रप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. उपराष्ट्रप्रमुख असताना बायडेन भारतात आले होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कृष्ण प्रकाश यांच्याकडे होती. त्यावेळी कृष्ण प्रकाश दक्षिण मुंबई विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त होते. बायडेन यांच्या दाैऱ्यादरम्यान मुंबई पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. त्यामुळे बायडेन यांनी पोलिसांचे काैतुक केले होते. कृष्ण प्रकाश यांच्याशी हस्तांदोलन करून बायडेन यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले होते. कृष्ण प्रकाश यांनी बायडेन यांच्यासोबतचा हस्तांदोलन करतानाचा फोटो फेसबुक पेजवर शेअर करून त्यांना अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भारत दाैऱ्यातील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
अमेरिका येथील खडतर स्पर्धा जिंकून 'आयर्नमन' ठरलेल्या पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसाठी ही अभिमानाची बाब असल्याची चर्चा शहरवासियांमध्ये आहे.