पुणे : शाळेच्या दुरुस्तीच्या कामाचे बील मंजुर करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना महापालिकेच्या रस्ते विभागातील उपअभियंत्यास आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे महापालिकेत सापळा रचून रंगेहाथ पकडले. पिंपरी महापालिकेतील लाच प्रकरण गाजत असतानाच पुणे महापालिकेतही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सुधीर विठ्ठलराव सोनवणे (वय ५१) असे या उपअभियंताचे नाव आहे.
याप्रकरणी एका बांधकाम ठेकेदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. या ठेकेदाराने २०१८ -१९ मध्ये केलेल्या शाळेच्या दुरुस्तीचे कामांचे बील पास झाले नसल्यामुळे त्यांनी उपअभियंता सुधीर सोनवणे याची भेट घेतली. बील मंजुर करणे व यापूर्वी दुसऱ्या कामाचे बील मंजुर केल्याचा मोबदला म्हणून त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार आल्यानंतर त्यांनी आज सुधीर सोनवणे त्यांच्या कार्यालयात असताना पडताळणी केली. तेव्हा त्यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आज दुपारी पुणे महापालिकेत सापळा रचण्यात आला. महापालिकेतील पार्किंगच्या आवारात तक्रारदार ठेकेदाराकडून ४० हजार रुपये स्वीकारताना सुधीर सोनवणे याला रंगेहाथ पकडण्यात आले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा नोंदविण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक भारत साळुंखे तपास करीत आहेत.
अन् त्याने लाचेची रक्कम वाढविली
शाळेच्या दुरुस्तीचे कामाचे बील मंजुर करण्यासाठी सुधीर सोनवणे याने अगोदर या ठेकेदाराकडे ३५ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर त्यांना आठवले की, यापूर्वी दुसऱ्या कामाचे बील मंजूर केले आहे. त्याचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी लाचेची रक्कम ३५ हजार रुपयांवरून वाढवून ५० हजार रुपये केली. त्यापैकी ४० हजार रुपये स्वीकारताना त्याला पकडण्यात आले.