पिंपरी : भारतीय जनता पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली. त्यात पिंपरी-चिंचवड शहरातील निष्ठावान महिला पदाधिकाऱ्याची वर्णी प्रदेशाध्यक्षपदी लागली असून या पदाधिकाऱ्याला भाजपातील पदाधिकाऱ्यांनी तेरा ते पंधरा लाखांची अलिशान गाडी भेट दिली आहे. याची चर्चा महापालिकेच्या राजकारणात सुरू आहे.मात्र या गोष्टीची कल्पना मिळाल्यावर पक्षश्रेष्ठींनी याची ताबडतोब दखल घेत हि गाडी परत पाठवण्याचे आदेश दिले. मात्र, पदाधिकाऱ्यांकडून मिळालेली 'लाख' मोलाची भेट परत कशी द्यावी असा प्रश्न उभा राहिला. मग पक्ष शिस्तीच्या चौकटीत ही 'आलिशान' भेट बसवत नंतर स्वतःजवळ ठेवून घेतली.
पिंपरी-चिंचवड महापालिका ही श्रीमंत महापालिका आहे. याठिकाणी नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे वाढदिवसही टोलेजंग साजरे होत असतात. तर सोन्याचा शर्ट, सोन्याचा मास्क तयार करून हौसमौज करणारेही याच शहरातील. भारतीय जनता पक्षाची नवीन कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहिर केली. त्यात पिंपरी-चिंचवडमधील चार निष्ठावान कार्यकर्त्यांना पक्ष संघटना बळकट करण्यासाठी संधी दिली आहे. त्यात प्रदेशपातळीवरील पद एका माजी विरोधीपक्षनेत्यांना मिळाले आहे. त्यांची निवड होताच त्यांना राज्यभर फिरण्यासाठी शहरातील प्रमुख नेत्यांनी पंधरा लाखांची गाडी भेट दिली आहे. कोरोनाच्या कालखंडातील अलिशान वाहन भेटीची, पदाधिकाऱ्यास मिळालेल्या भेटीची चर्चा शहरातील राजकारणात आहेत.
गरजवंतांना हवा मदतीचा हात... भाजपात स्थानिक पातळीवर अनेक कार्यकर्ते निष्ठेने काम करीत आहेत. मात्र, त्यांना अजूनही कोणतही पद मिळालेले नाही. तसेच महापालिकेत सत्ता येऊनही आर्थिक सक्षमताही नाही, अशा कार्यकर्त्यांनाही मदतीचा हात द्यावा, अशी मागणी निष्टावान कार्यकर्ते करीत आहेत.