आळंदी : हरित न्यायालयाने इंद्रायणीत कचरा टाकण्यासाठी मनाई केल्यामुळे आळंदी नगर पालिकेचे कचरा कोंडी झाली आहे. आळंदीत दररोज निर्माण होणारा २० टन कचरा साठवायचा कुठे? या गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज विशेष सभेचे आयोजन केले होते. यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शेजारधर्म पाळावा असे आवाहन करीत कचऱ्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी नगरपालिका प्रशासनासह नगरसेवकांनी केली.नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित केली होती. त्यांनी नकार दर्शविलाच तर वॉर्डातील कचरा वॉर्डातच साठवण्याची व विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया राबवून कंपोस्ट खतनिर्मिती करण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त केला.इंद्रायणी नदीच्या पात्रात न टाकता दिलेल्या ठिकाणीच कचरा टाकावा, कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प सुरू होईपर्यंत लगतच्या ग्रामपंचायत किंवा महापालिकेच्या कचरा डेपोत आळंदीतील कचरा टाकावा व त्याचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सात दिवसांत सादर करावे, असा राष्ट्रीय हरित न्यायालयाने न.प.ला आदेश दिल्यामुळे उपाययोजना करण्यासाठी ही बैैठक झाली. सभेत प्रत्येक वॉर्डनिहाय निर्माण होणारा कचरा वॉर्डातच विल्हेवाट लावावी, यासाठी प्रबोधन करून वॉर्डातच कंपोस्ट खत युनिट उभारून प्रक्रिया करणे, ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्यात यावे, नागरिकांनी असा वर्गीकरण करून कचरा दिल्यास तो न. प.ने विकत घ्यावा किंवा नागरिकांना बक्षीस देण्यात यावे, युनिटी ग्रीन यांना शाळा क्र .४ व वॉटरहाऊसजवळ शेड तयार करून यंत्रसामग्री उभी करण्याबाबत सोय उपलब्ध करून द्यावी, शहरातील शाळांमधून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला घनकचरा व्यवस्थापनाचे धडे मिळावेत,यासाठी पणजी महापालिकेच्या धर्तीवर पासबुक योजना राबवावी, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी ओला व सुका कचरा वेगळा करून नगरपालिकेला आणून दिल्यास कचऱ्याच्या प्रमाणात विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस योजना राबवावी, नागरिकांकडून ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी शहरात ज्या मालमत्ताधारकांनी कर भरला आहे, अशा मालमत्ताधारकांना विघटित होणाऱ्या पिशव्यांचे मासिक स्तरावर वाटप करण्यात यावे, अशा सूचना मांडण्यात आल्या.यावर उपस्थित सर्व नगरसेवकांनी हा पर्याय स्वीकारत होकार दर्शविला आहे. मात्र, तत्पूर्वी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मार्गी लागेपर्यंत पिंपरी-चिंचवड पालिकेकडे याबाबतचा पाठपुरावा करण्याची व लगतच्या ग्रामपंचायतीकडे मागणी करण्याची गरज असल्याचे सांगितले व जर यात यश आले नाही, तर वॉर्डातील कचऱ्याची विल्हेवाट आम्ही सर्व आळंदीकरांमार्फत लावू, असे आश्वासन देत सर्वांनीच जबाबदारी स्वीकारली. (वार्ताहर)आळंदीतील कचऱ्याची समस्या भीषण असली, तरी सर्व नगरसेवक व जनतेच्या सहकार्याने हा प्रश्न निश्चितच सोडवण्यात आम्ही यशस्वी होऊ. पिंपरी-चिंचवड पालिकेकडे आमचा पाठपुरावा चालू आहे. त्यांची संमती मिळेल, अशी खात्री आहे.- रोहिदास तापकीर,नगराध्यक्षयापूर्वी पिंपरी-चिंचवडच्या डेपोतच ५० पैसे किलो दराने टाकला जायचा. आताही तशीच मागणी करण्यात आली आहे. प्रक्रिया करून विल्हेवाट लावणाऱ्यास बक्षीस योजना जाहीर केल्यास चांगला प्रतिसाद मिळेल.- अशोक कांबळे, नगरसेवक
पिंपरी महानगरपालिकेने शेजारधर्म पाळावा
By admin | Published: July 17, 2015 3:48 AM