पिंपरीपेंढार येथील जांभूळपट शिवारात राहणारे विशाल कुटे हे काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सर्व कुटुंबीयांसोबत बाहेर गेले होते. त्यानंतर, ते सर्वजण रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुन्हा घरी आले, त्यावेळी त्यांना घराच्या उत्तर बाजूस असलेला दरवाजा उघडा दिसला व आतमधील खोलीत जाऊन पाहिले असता, चोरट्यांनी त्यांच्या कपाटामधील दागिने व पन्नास हजार रुपये रोख नेले असल्याचे निदर्शनास आले. या चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने घराच्या छप्परावर चढून कौले काढली व आत प्रवेश केला. कुटे यांनी या घटनेची माहिती तत्काळ ओतूर पोलीस स्टेशनला कळविली. ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे व टीमने रात्रीच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. त्यानंतर, सकाळी जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, यांनी प्रत्यक्ष पाहणी केली, घटनास्थळी पुण्यावरून श्वान पथक व फिंगरप्रिंट पथकही येऊन दाखल झाले. पुढील तपास ओतुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
फोटो- पिंपरी पेंढार येथे घरफोडी करून चोरट्यांनी पाच लाखांचा ऐवज लांबविला.