पिंपरी : गंभीर गुन्ह्याचे कलम कमी केल्याने आरोपींना जामीन मिळाला. तसेच, तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पिंपरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह एका पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन करण्यात आले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मंगळवारी (दि. २२) रात्री उशिरा याबाबतचे आदेश दिले.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे आणि पोलीस उपनिरीक्षक एस. एस. जाधव असे निलंबित केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. एका गंभीर गुन्ह्यात आरोपींवर लावलेले कलम कमी करण्याबाबत निरीक्षक निकाळजे यांनी न्यायलायला लेखी अहवाल दिला. त्यामुळे आरोपींची जामिनावर सुटका झाली. तसेच, उपनिरीक्षक जाधव यांनी देखील न्यायालयाकडे अहवाल सादर केला. आरोपींवरील दरोड्याचे कलम कमी करण्याबाबतचा तो अहवाल होता. त्यानुसार या प्रकरणातही आरोपींना जामीन मिळाला. कलम कमी करून आरोपींना जामीन मिळण्यास मदत केल्याचा ठपका ठेवून त्यांचे निलंबन करण्यात आले.