पिंपरी : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व दळवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत दिल्ली येथे बुधवारी बैठक झाली. त्यावेळी पुणे शहरातून जाणा-या वनाझ ते रामवाडी या वादग्रस्त मेट्रो मार्गाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेल्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या प्रकल्पाचा लवकरच मुहूर्त मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मेट्रो प्रकल्प राबविण्याची घोषणा तत्कालीन काँग्रेसच्या आघाडी सरकारने केली होती. त्यानुसार कार्यवाहीही सुरू झाली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी याबाबतचे सर्वेक्षण पूर्ण झाले होते. मेट्रोच्या पहिल्या आणि दुसऱ्या कॉरिडोर अंतर्गत स्वारगेट ते पिंपरी आणि वनाझ ते रामवाडी या मार्गाचे नियोजन केले होते. केंद्रात व राज्यात सत्तांतर झाले. भारतीय जनता पक्षाचे सरकार आले. दरम्यानच्या कालखंडात पुणे मेट्रोपूर्वी नागपूर मेट्रोला मंजुरी मिळाली होती. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या मेट्रोबाबत राजकारण होत असल्याची टीका राष्ट्रवादीने केली होती. दोन्ही मार्गाचा एकच आराखडा असल्याने दोन्ही मार्गांचे प्रकल्प एकावेळी सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. परंतु, पुण्यातील वनाज ते रामवाडी या वादग्रस्त मार्गामुळे हा प्रकल्प रखडला होता. नितीन गडकरी यांनी दिल्लीत या वादग्रस्त मार्गाचा विषय मंजूर केला. त्यामुळे आता पिंपरी मेट्रोलाही लवकरच चालना मिळणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पिंपरी ते स्वारगेट मेट्रो लागणार मार्गी
By admin | Published: September 10, 2015 4:11 AM