- नितीन शिंदे
भोसरी : अखेर अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवर पडदा पडला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्ष अजित गव्हाणे, विद्यार्थी अध्यक्ष यश साने, शहर कार्याध्यक्ष राहुल भोसले आणि भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे सादर केला. विशेष म्हणजे उद्याच (दि. 17) पुण्यात या सर्वांचा शरद पवार गटात शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अजित पवार यांना अपेक्षित यश न मिळाल्याने अजित पवार गटात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. त्याचीच परिनिती पिंपरी चिंचवडमध्ये पहायला मिळत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवड मध्ये धक्क्यावर धक्के सोसावे लागत आहेत. मंगळवारी शहरातील 25 माजी नगरसेवकांना सोबत घेत अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे राजीनामा सादर केला. 25 माजी नगरसेवकांसह विद्यार्थी, युवकच्या पदाधिकाऱ्यांनी ही राजीनामा सादर केला आहे.
पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र आता याच बालेकिल्ल्याला शरद पवार सुरुंग लावला. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता समस्त महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकचे वेध लागले आहे. राजकीय पक्षांनीदेखील या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली तयारी चालू केली आहे. पिंपरी चिंचवड मधील पदाधिकारी ही यामध्ये मागे नाही. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर लागलीच पदाधिकाऱ्यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये सर्वे करून घेतले ज्यामध्ये अजूनही शरद पवार यांच्याबाबत सहानुभूतीची लाट असल्याचे दिसून आले त्याचीच परिणीती पक्षप्रवेशात दिसून येत आहे.
गव्हाणेंना रेड कार्पेट ?अजित गव्हाणे यांच्या माध्यमातून गव्हाणे कुटुंबीयांची तिसरी पिढी पिंपरी चिंचवडच्या राजकारणात सक्रिय आहे. अजित गव्हाणे यांच्या आजोबांपासून वडिलांपर्यंत आणि आता अजित गव्हाणे हे सक्रिय राजकारणात आहेत. अजित गव्हाणे हे सुसंस्कृत, मितभाषी, उच्चशिक्षित व्यक्तिमत्व म्हणून शहराला परिचित आहे. त्यांच्या माध्यमातून एक चांगला उमेदवार भोसरी विधानसभेसाठी मिळू शकतो. अशी गणिते शरद पवार गटाची आहेत. त्यामुळेच अजित गव्हाणे यांच्याकडून पक्षप्रवेशाचे संकेत देताच त्यांच्यासाठी शरद पवार गटाकडून रेड कार्पेट हातरण्यात आले. आणि लागलीच उद्याच हा पक्ष प्रवेश होत आहे.