पिंपरी: सातारा, सांगली-मिरज येथून लोणच्याच्या कैरीची पिंपरी येथील भाजी मंडईत तीन टन आवक झाली. तसेच इंदूर येथून महाबळेश्वर गाजरही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाले. तसेच आवक होऊनही गवार, भेंडी व घोसाळीचे दर या आठवड्यात वाढले आहेत. तर इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत.
उन्हाळ्यात लोणच्याच्या कैरीला मोठी मागणी असते. त्याअनुषंगाने सातारा, सांगली व मिरज भागातून पिंपरी येथील भाजीमंडईत रविवारी लोणच्याच्या गावरान कैरीची मोठी आवक झाली. प्रतिकिलो ५० रुपये दराने या कैरीची विक्री झाली. तसेच इंदूर येथून दाखल झालेल्या महाबळेश्वर गाजरलाही ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. अहमदनगर येथून गावरान वांगी दाखल झाली आहेत. तर जुन्नर भागातून चवळीची आवक वाढली आहे. प्रतिकिलो ५० ते ६० रुपये दराने चवळीची विक्री होत आहे. उन्हाळ्यामुळे लिंबूला मागणी वाढली आहे. प्रतिशेकडा ३०० ते ३५० रुपये लिंबूचा दर आहे. बटाटा व कांद्याचा दर सध्या आवाक्यात आहे. तसेच पालेभाज्यांचेही दर स्थिर आहेत.
सध्या इंदूर येथील महाबळेश्वर गाजराला आणि काकडीला चांगली मागणी आहे. लोणच्यासाठी गावरान कैरीला ग्राहकांची पसंती आहे. कोरोनामुळे खबरदारी घेऊन भाजीपाला विक्री केली जात आहे. - संजय वाडेकर, विक्रेता
कोरोना व उन्हाळ्यामुळे फळभाज्या खरेदीला पसंती आहे. मात्र काकडी, गाजर, घोसाळी, गवार, लिंबू यांच्या दरात वाढ होत आहे. तर पालेभाज्या उन्हामुळे टिकत नाहीत. त्यामुळे मोठी अडचण होत आहे. ऋची गुप्ता, गृहिणी फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो) बटाटे: १५ ते २०, कांदे: २० ते ३०, टोमॅटो: १० ते १५, गवार (गावरान): ७० ते ८०, सुरती गवार: ८०, दोडका: ५० ते ६०, घोसाळी: ६० ते ७०, लसूण: ८० ते १००, आले: ३० ते ४०, भेंडी: ६०, वांगी: ४०, गावरान वांगी: ३० ते ४०, काळी वांगी: १५ ते २०, कोबी: १५ ते २०, शेवगा: २० ते २५, काळी मिरची: ६० ते ७०, हिरवी मिरची: ६०, शिमला मिरची: ५०, पडवळ: ५० ते ६०, दुधी भोपळा: ४० ते ४५, लाल भोपळा: २०, काकडी: ३० ते ४०, चवळी: ५० ते ६०, काळा घेवडा: ७० ते ८०, तोंडली: ६० ते ७०, गाजर: २० ते २५, वाल: ६० ते ७०, राजमा: ८०, मटार (वटाणा): ८० ते ९०, कारली: ५० ते ६०, पावटा: ६०, श्रावणी घेवडा: ६० ते ७०, बिट: ३०, फ्लॉवर: ३०, तोतापुरी कैरी (कर्नाटक): ३० ते ४०, गावरान कैरी (लोणच्याची): ५० ते ६० लिंबू (शेकडा): ३०० ३५०.
पालेभाज्यांचे भाव (प्रति गड्डी)कोथिंबीर: १०, मेथी: १०, शेपू: १०, पालक: १०, मुळा: १५, तांदुळजा: १०, करडई: १०, आंबटचुका: १०, चवळी: १०, हिरवा माठ: १०, राजगीरा: १०, पुदिना: ५, आंबाडी: १०, कांदापात: १५, हरबरा: १०, गवती चहा: ८ ते १०, लालबिट: १०.