पिंपरी : पुणे-लोणावळा लोकल मार्गाचे चौपदरीकरण करण्याची अनेक वर्षांपासून प्रलंबित मागणी यंदाही मार्गी लागली नाही. पुणे- मुंबई मार्गावर एक्सप्रेस गाड्याच्या संख्येत वाढ, पुणे - नाशिक नवा रेल्वे मार्ग, चिंचवड आणि तळेगाव रेल्वे जंक्शन करणे, लोणावळा ते दौंड लोकल सुरू करणे आदींना रेल्वे अर्थसंकल्पात स्थान मंजूरी न मिळाल्याने पिंपरी- चिंचवड आणि मावळ तालुक्यातील रेल्वे प्रवाशांची घोर निराश झाली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजीत पवार, खासदार श्रीरंग बारणे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही अनेक अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्याकडेही साफ दुर्लक्ष केले गेले आहे. मात्र, दुसरीकडे रेल्वे प्रवासात कोणतीही भाडे दर वाढ न केल्याचे समाधान प्रवाशांनी व्यक्त केले. प्रवास अधिक सुलभ होण्यासाठी पुणे ते लोणावळा लोकल मार्गाचे चौपदरीकणांची मागणी रखडली आहे. यामुळे लोकल उपनगरी वाहतून अधिक जलद होणार होती. या कामाचे सर्व्हेक्षणही झाले होते. त्यामुळे सर्वांच्या अपेक्षा बळावल्या होत्या. मात्र, अर्थसंकल्पात तो मांडला गेला नाही. पुणे- नाशिक नवा रेल्वे मार्गास २००९ ला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली होती. या संदर्भात पुढे कोणतीच कार्यवाही पुढे झाली नाही. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे अर्थसंकल्पात या मार्गाबाबत ठोस घोषणा करण्याची अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. (प्रतिनिधी)
रेल्वे अर्थसंकल्पातून पिंपरीकरांची निराशा
By admin | Published: February 27, 2015 6:03 AM