पुणे : विधवा महिलांची तसेच नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलीस पिंट्या उर्फ मेहबूब शेख उर्फ पिंट्या भाई याच्यावर यापुर्वी गुन्हा दाखल आहे. आता तो पोलिसांनाच आव्हान देत आहे. वानवडी पोलिसांत असलेल्या अधिकाऱ्यांची गडचिरोलीला बदली केल्याचे मेसेज विविध व्हॉट्सॲपग्रुपवर टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्याच्यासह त्याच्या टोळीवर संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याची मागणी पीडित नागरिकांसह माजी नगरसेवक फारुक इनामदार यांनी केली.
सरकारी जागांचे बोगस दस्तऐवज करून ही टोळी फसवणूक करते. या टोळीवर स्वतंत्र गुन्हे दाखल करून गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात यावा, अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली. यावेळी उरसुला हरीश स्वामी, फहिम चांद शेख, मंजूर शेख, वैशाली केदारी, जहुर सय्यद, तन्वीर मणियार उपस्थित होते.
हडपसर, हांडेवाडी रोड परिसरात सर्व्हे नंबर ५७, ५९, ४५, ७२ मधील २० एकर जागा पिंट्याने व त्याच्या टोळीने बळकावली आहे. तसेच बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवून तो बेकायदेशिररित्या जागा विकत आहे. नुकताच पिंट्याच्या टोळीवर गुन्हा दाखल करणारे पोलीस अधिकारी जोगदंड यांची नुकताच बदली गडचिरोली येथे झाली आहे. याचाच फायदा घेत तो नागरिकांमध्ये आमच्या नादी लागायचे नाही, त्या प्रमाणे बदली करू, आमच्यावर गुन्हे दाखल करणाऱ्यांची आम्ही कशी बदली केली, अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर टाकत असल्याचे इनामदार म्हणाले.
यावेळी विधवा महिलेच्या दोन दुकानावर ताबा घेतला आहे. त्यातच उरुळी देवाची येथील सर्व्हे नंबर २९ येथे एका तक्रारदाराने एक गुंठा जागा घेतली. त्यासाठी त्याने साडे नऊ लाख रूपये दिले नंतर त्याला ती जागा बोगस असल्याचे समजले. तिसऱ्या तक्रारदाराने तर ऑनलाईन तब्बल १६ लाखांचा व्यवहार केला. त्याला जागा दाखविण्यात आली. तेथे त्याने शेडही मारले. परंतु, पैसे मिळताच दुसर्या दिवशी त्याचे शेड काढून टाकून देण्यात आले. या आणि अशा शेकडो लोकांची या निमित्ताने फसवणूक झाल्याचे प्रकार तक्रारी आहेत.
----------------ः
जागेबाबत जर कोणाची फसवणूक झाली असेल, त्यांनी प्रत्यक्ष वानवडी पोलिस ठाण्यात यावे. तक्रारी द्यावी. त्यानंतर याबाबत योग्य ती कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात येईल.
- दीपक लगड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वानवडी पोलिस ठाणे