पिरंगुट : कोरोना विषाणूचा पॉझिटिव्ह रुग्ण हा मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे आढळून आल्याने संपुर्ण मुळशी तालुक्यासह प्रशासन ही हादरून गेले आहे.या पॉझिटिव्ह रुग्णामुळे ग्रामीण भागातही आता नागरिकांच्या चिंतेची घरघर वाढली आहेपिरंगुट येथे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला असल्याची माहिती मुळशी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अजित करंजकर यांनी दिल्या नंतर या ठिकाणी प्रशासनाने तत्काळ धाव घेत पुढील कार्यवाही करण्यास सुरूवात केली असून खबरदारी म्हणून संपुर्ण पिरंगुट गाव हे लगेचच क्वारंटाईन केले आहे.पिरंगुट येथील एका ३६ वर्षीय महिलेमध्ये कोरोना पॉझिटिव्हची लक्षणे आढळून आली असून प्रशासनाकडून मिळालेल्या माहिती नुसार ही व्यक्ती आजारी असल्याने एका खाजगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल झाल्या होत्या.तेव्हा त्या महिला एक दिवस या दवाखान्यामध्ये अॅडमिट सुद्धा होत्या. डॉक्टरांना रुग्णांविषयी शंका आल्यानंतर त्यांची पुणे येथील नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोना टेस्ट करण्यासाठी त्यांना पाठविले असता त्या ठिकाणी त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली. या घटनेची वार्ता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरताच संपुर्ण पिरंगुट गावासह संपुर्ण मुळशी तालुकामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या महिला खाजगी दवाखान्यामध्ये एक दिवस अॅडमीट होत्या. तेव्हा या एक दिवसांमध्ये या दवाखान्यामध्ये कोण कोण आले होते तसेच किती रुग्ण आले व गेले याची संपूर्ण माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.या सर्व प्रकरणानंतर खबरदारी म्हणून प्रशासनाच्या वतीने संपुर्ण पिरंगुट गाव क्वॉरंटाईन करून या गावाच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून संपूर्ण पिरंगुट गावामध्ये निर्जंतुक फवारणी सुरू केली असून प्रशासनाच्या वतीने पिरंगुट मधील प्रत्येक कुटुंबांचा सर्व्हे सुरु केलेला आहे अशी माहिती गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी दिली.या सर्व प्रकरणाची माहिती मिळताच मुळशी तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण,गटविकास अधिकारी संदीप जठार,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अजित करंजकर यांनी पिरंगुट येथे धाव घेतली. तेव्हा या ठिकाणच्या अजून दोन व्यक्तीची कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यांचे ही रिपोर्ट लवकरच मिळणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.