पुणे : कोरोना काळात पुस्तकांच्या पायरेटेड पीडीएफचा सोशल मीडियात सुळसुळाट झाला आहे. नामवंत लेखक आणि प्रकाशकांच्या पुस्तकांच्या पायरेटेड पीडीएफ विविध मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध करून दिल्या जात असल्याने काही प्रकाशकांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली आहे. पुस्तकांच्या पायरेटेड पीडीएफ तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रकाशकांनी केली आहे.
कॉपीराईट कायद्याचा भंग करून पुस्तके स्कॅन करून त्याला पीडीएफ स्वरूप दिले जात आहे. पुस्तकांच्या या पीडीएफ वाचकांना सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे प्रकाशकांपासून लेखकांपर्यंत सर्वांना आर्थिक फटका बसू लागला आहे. मेहता पब्लिकेशन्सचे सुनील मेहता यांनी सायबर पोलिसांकडे याबाबत नुकतीच तक्रार केली आहे. प्रकाशन संस्थांना आधीच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यात असे प्रकार घडू लागल्याने प्रकाशन व्यवसायाला आणखी झळ बसत असल्याचे प्रकाशकांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात सुनील मेहता म्हणाले की, सुमारे पाचशे पुस्तकांचे पायरेटेड पीडीएफ एका संकेतस्थळावर डाऊनलोड केल्याचे आमच्या निर्दशनास आले. या पीडीएफ काही व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये फिरत आहेत. त्यामुळे आम्ही पोलिसांकडे तक्रार केली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. असे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. यामुळे सरकारच्या महसूलाचेही नुकसान होत आहे. प्रिंटर, बाईंडर, प्रकाशक, ऑनलाइन पुस्तक विक्री, इन्कम ॉटॅक्स, जीएसटी सर्व कर बुडत आहेत.
“लेखक पाच ते सहा वर्षे खर्च करून दर्जेदार पुस्तक लिहितो. त्याला त्याची रॉयल्टी मिळते. पायरेटेड पुस्तके आली तर त्यांची रॉयल्टी बुडते. आपली मराठी भाषा आपल्यालाच टिकवता येत नाही. जर सरकारने याबाबत ठोस भूमिका घेतली तर इतर राज्यही त्याचे अनुकरण करतील,” असे मेहता म्हणाले.
चौकट
“प्रकाशकांना पायरेटेडसह पीडीएफ पुस्तकांचा देखील फटका बसतो आहे. आधीच पुस्तक व्यवसाय अडचणीत आहे. ग्रंथालयांना अनुदान नाही. इंग्रजीच्या तुलनेत मराठी पुस्तके कमी वाचली जात आहेत. अशा काळात पुस्तकांच्या पीडीएफ फाईल येणे म्हणजे आर्थिक नुकसान आहे. यामुळे कॉपीराईटसारखे मुद्दे निकालात निघाले आहेत.”
- सुनीताराजे पवार, प्रकाशक
चौकट
“प्रकाशकांनी ‘प्रिंट ऑन डिमांड’ला पुस्तक देताना काळजी घेणे महत्वाचे आहे. पीडीएफ च्या अडीचशे फाईल्स सगळीकडे फिरत आहेत. त्याची पाळेमुळे सायबर पोलिसांना देखील शोधणे शक्य नाही. त्यापेक्षा सर्व प्रकाशकांनी याबाबत गुगलकडे तक्रार करायला हवी. तरच याला आळा बसू शकेल.”
-अनिल कुलकर्णी, कार्याध्यक्ष, मराठी प्रकाशक परिषद