सासवड : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात पुरंदर उपसाच्या पाण्यामुळे पिण्याच्या जलस्रोतांचे पाणी दूषित झाले आहे, तसेच पाण्यात क्षारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढवल्याने याचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. यापासून नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी पिसर्वे ग्रामपंचायतीने शासनाच्या जिल्हा परिषदेच्या १४ व्या वित्त आयोगातून ५ लाख खर्चातून ग्रामपंचायत कार्यालयाजवळ जलशुद्धीकरण प्रकल्प उभा करून नागरिकांसाठी सुरू केला आहे. पिसर्वेच्या या प्रकल्पामुळे परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना याचा फायदा होत आहे. ग्रामपंचायतीने ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर याची उभारणी करून केवळ पाच रुपयांच्या नाण्यात २० लिटर शुद्ध पाणीपुरवठा सुरू केला आहे. या भागातील पाण्यात क्षारांचे प्रमाण ११०० ते १२०० पर्यंत आहे, माणसाच्या आरोग्यासाठी क्षारांचे प्रमाण केवळ १०० पर्यंत असणे गरजेचे आहे, या प्रकल्पातील पाण्यात क्षारांचे प्रमाण केवळ ५० आहे. सध्या या भागात प्रत्येक घरी पिण्याच्या पाण्यासाठी २० लिटर पाण्याच्या जारचा वापर होतो, त्यासाठी नागरिकांना ३० ते ४० रुपये प्रतिजार मोजावे लागतात. मात्र पिसर्वे ग्रामपंचायतीच्या या प्रकल्पामुळे नागरिकांना केवळ ५ रुपयांत २० लिटर शुद्ध पाणी मिळत असल्याने अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या प्रकल्पाचे उद्घाटन माजी जिप सदस्य सुदाम इंगळे, विजयराव कोलते यांच्या हस्ते नुकतेच झाले. याप्रसंगी सरपंच लक्ष्मी रवींद्र वाघमारे, उपसरपंच बायडाबाई कोलते, सदस्य मच्छिंद्र कोलते, गणेश कोलते, नितीन वायकर, याकूब सय्यद, सुनील कोलते, सदस्या शालन कासवेद, नंदा कोलते, संगीता कोल्हाळे, ग्रामसेविका शीतल फरांदे, माजी सरपंच शांताराम कोलते, संभाजी कोलते, शिवाजी कोलते, शांताराम कटके, शिवकुमार कोट्टलगी, अनिल शेंडगे, नितीन कोलते आदी उपस्थित होते.
पिसर्वे ग्रामपंचायतीचा पाणीप्रश्न मिटला
By admin | Published: January 02, 2017 2:20 AM